एसटी महामंडळाचे मोठे निर्णय... डिझेल बसेस बंद होणार... सार्वजनिक–खासगी भागीदारीवर हे सुरू करणार...

Share:
Main Image
Last updated: 12-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १२ मे -  "एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्व बसेस २०३५ पर्यंत ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने निश्चित केले आहे. या पर्यावरणपूरक मोहिमेला गती देण्यासाठी राज्यभरात सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (PPP) किमान २०० चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत," अशी महत्त्वाची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात आयोजित एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

२० हजार ई-बसेसचे उद्दिष्ट

भविष्यात एसटीच्या ताफ्यात सुमारे २० हजार ई-बसेस दाखल होणार आहेत. त्यांच्या चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे मंत्र्यांनी नमूद केले. या प्रकल्पांतर्गत एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागांवर आधुनिक चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

खासगी गाड्यांनाही 'चार्ज' होता येणार!

Advertisement

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे, संबंधित विकासकाला १५०० चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर दिली जाईल. तिथे एसटीच्या बसेससोबतच खासगी ई-वाहनांनाही चार्जिंगची सुविधा उपलब्ध असेल. यामुळे महामंडळाला दुहेरी फायदा होणार आहे:

१. एसटीच्या बसेसना माफक दरात चार्जिंग मिळेल.

२. खासगी वाहनांच्या शुल्कातील नफ्याचा वाटा आणि जागेचे भाडे यातून महामंडळाला अतिरिक्त महसूल मिळेल.

येत्या काही दिवसांत या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू होणार असून, यामुळे एसटी महामंडळ पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

?s=20

Comments

No comments yet.