नाशिक, (विशेष प्रतिनिधी) १२ मे - शहरातील उड्डाणपुलावर गुरुवारी झालेल्या एका भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमराज प्रकाश बडगुजर (वय २५, रा. पार्क साईट होम, हनुमाननगर, आडगाव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमराज बडगुजर हा गुरुवारी (दि. ७) आपल्या ज्युपिटर दुचाकीने (क्रमांक एमएच १५ एचई ७२३९) पाथर्डी फाटा भागातून आपल्या घराकडे परतत होता. रात्रीच्या सुमारास उड्डाणपुलावरून द्वारकाच्या दिशेने जात असताना, प्रकाश पेट्रोल पंपासमोर एका भरधाव अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात प्रेमराजला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र जखमा गंभीर असल्याने त्याचा मृत्यू झाला.
पोलीस तपास सुरू
या घटनेबाबत मृताचे काका हिरालाल बडगुजर यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर अपघाताचा आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलीस हवालदार कुलथे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने फरार वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.