सुनेत्रा पवारांचा मास्टरस्ट्रोक... प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना दिला हा दणका...

Share:
Main Image
Last updated: 12-May-2026

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) १२ मे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) अंतर्गत राजकारणात एक मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदावरून अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या नव्या पत्रातून ही बाब स्पष्ट झाली असून, या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ११ मे रोजी अपलोड करण्यात आलेल्या तीनपानी सुधारित पत्राने या बदलांवर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे.

सुनेत्रा पवारांकडे धुरा; युवा पिढीला संधी

पक्षाच्या नव्या संरचनेनुसार, सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कायम आहेत. मात्र, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या दिग्गज नेत्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदे काढून घेण्यात आली आहेत. याउलट, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची जबाबदारी सोपवून पक्षात 'युवा पर्वा'ला सुरुवात करण्यात आली आहे.

नवी राष्ट्रीय कार्यकारिणी अशी:

राष्ट्रीय अध्यक्ष: सुनेत्रा पवार

Advertisement

कोषाध्यक्ष: शिवाजीराव गर्जे

राष्ट्रीय सरचिटणीस: पार्थ पवार, सुबोध मोहिते

राष्ट्रीय सचिव: जय पवार, अविनाश आदिक, सना मलिक, धीरज शर्मा, संजय प्रजापती, राणा रणवीरसिंग, डॉ. रमणप्रीत सिंग, धनंजय शर्मा आणि डॉ. अभिषेक बोके.

पटेल आणि तटकरे केवळ 'सदस्य'

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना २२ सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आले असले, तरी त्यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. फेब्रुवारी महिन्यात दिलेल्या पत्रातच पटेल यांचे नाव वगळले गेल्याची चर्चा होती, मात्र आता आयोगाच्या वेबसाईटवरील पत्रामुळे यावर अंतिम मोहोर उमटली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला पदमुक्त केल्याने पक्षांतर्गत समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments

No comments yet.