नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) १२ मे - कर्नाटकच्या श्रृंगेरी विधानसभा मतदारसंघातील आमदारकीच्या निवडणुकीला आता एक नाट्यमय वळण मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते टी. डी. राजेगौडा यांना मोठा दिलासा देत त्यांची आमदारकी तूर्तास कायम ठेवली आहे. मतांच्या फेरमोजणीत भाजप उमेदवार डी. एन. जीवराज यांना विजयी घोषित करण्यात आले होते, मात्र कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे हा विजय आता तात्पुरता ठरला आहे.
सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने भाजप उमेदवाराच्या बाजूने झालेल्या फेरमोजणीच्या प्रक्रियेवर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. "आम्ही तुम्हाला अशा प्रकारे लोकशाहीचे अपहरण करू देऊ शकत नाही," अशा शब्दांत कोर्टाने संताप व्यक्त केला.
नेमके प्रकरण काय?
२०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या टी. डी. राजेगौडा यांनी भाजपच्या डी. एन. जीवराज यांचा केवळ २०१ मतांनी पराभव केला होता. या निकालाला जीवराज यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ६ एप्रिल रोजी २७९ बाद झालेल्या पोस्टल बॅलेटची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश दिले होते.
फेरमोजणीतील 'तो' निकाल ठरला अवैध
३ मे रोजी निवडणूक अधिकाऱ्यांनी सुधारित निकाल जाहीर केला होता. यामध्ये नाट्यमयरीत्या राजेगौडा यांची २५५ मते कमी झाली आणि भाजपचे जीवराज ५२ मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. मात्र, या प्रक्रियेतील त्रुटी लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने फेरमोजणीपूर्वीची स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे टी. डी. राजेगौडा हेच श्रृंगेरीचे आमदार म्हणून पदावर कायम राहतील.
महत्त्वाचे मुद्दे:
न्यायालयाची टिप्पणी: फेरमोजणीच्या प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाने ओढले ताशेरे.
स्थिती जैसे थे: फेरमोजणीपूर्वीचा निकाल ग्राह्य धरून राजेगौडा यांची आमदारकी कायम.
पार्श्वभूमी: २०२३ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा २०१ मतांनी विजय झाला होता.