नाशिकमध्ये भामट्यांचा उच्छाद... जेहान सर्कलला महिलेची पोत लांबवली... कॉलेज रोडला मुलाचा मोबाईल हिसकावला...

Share:
Main Image
Last updated: 11-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ मे - शहरातील गंगापूर रोड आणि कॉलेज रोड या वर्दळीच्या भागात जबरी चोरीच्या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पतीसोबत जेवण करून परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे पावणेतीन लाखांचे मंगळसूत्र दुचाकीस्वाराने हिसकावून नेले, तर दुसऱ्या घटनेत एका अल्पवयीन मुलाला भीती दाखवून त्याचा मोबाईल लंपास करण्यात आला.

Advertisement

कारजवळ उभे असतानाच मंगळसूत्र लंपास
पहिली घटना जेहान सर्कल परिसरातील हॉटेल 'करी लिव्ह' जवळ घडली. चैतन्यनगर येथे राहणाऱ्या सुजाता बाळासाहेब कासार या शनिवारी (दि. ९) रात्री पतीसह जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. रात्रीचे जेवण आटोपून त्या एसबीआय बँकेजवळ पार्क केलेली आपली कार काढण्यासाठी गेल्या. पती-पत्नी कारजवळ उभे असतानाच मोपेड दुचाकीवर आलेल्या एका भामट्याने सुजाता यांच्या गळ्यातील ३३ ग्रॅम वजनाचे (दुपदरी) सोन्याचे मंगळसूत्र जोरात हिसकावून नेले. या मंगळसूत्राची किंमत सुमारे २ लाख ९० हजार रुपये आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून उपनिरीक्षक भरत पाटील तपास करत आहेत.

"फोटो का काढले?" म्हणत मुलाची लूट
दुसरी घटना कॉलेज रोडवरील 'कार्स २४' शोरूम समोर घडली. हर्ष सोनवणे हा मुलगा आपल्या मित्रांसोबत पायी जात असताना एका अनोळखी इसमाने त्यांची वाट अडवली. "माझ्या फॅमिलीचे फोटो का काढले?" असा खोटा जाब विचारून त्याने हर्षला दमदाटी केली आणि त्याच्या हातातील १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी ललिता सोनवणे (रा. धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार राऊत तपास करत आहेत.

गंगापूर पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे रात्रीच्या वेळी बाहेर पडताना नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.