नाशिकमध्ये बालकांच्या अपहरणाचे सत्र... दोन दिवसांत चार मुले बेपत्ता...

Share:
Main Image
Last updated: 11-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ मे - नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, दोन दिवसांत विविध भागांतून चार मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. यात तीन अल्पवयीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. या सर्वांना कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, नाशिकच्या चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रामवाडी आणि भाभानगरमधून मुली बेपत्ता

पहिली घटना पंचवटीतील रामवाडी भागात घडली. आदर्शनगर परिसरातील एक अल्पवयीन मुलगी शनिवारपासून (दि. ९) बेपत्ता आहे. दुसरी घटना मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भाभानगर भागात घडली. येथील मनपा गार्डन परिसरात राहणारी मुलगी देखील शनिवारपासून घरी परतलेली नाही. या दोन्ही मुलींना कुणीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याची फिर्याद नातेवाईकांनी दिली आहे.

इमारतीसमोर खेळणारी चिमुकली गायब

Advertisement

तिसरी धक्कादायक घटना गंगापूर रोडवरील शंकर नगर भागात घडली. येथील एक अल्पवयीन मुलगी शनिवारी आपल्या इमारतीसमोर खेळत असताना अचानक गायब झाली. तिला कुणीतरी पळवून नेल्याची खात्री पटल्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळाली कॅम्पमधून मुलगा बेपत्ता

देवळाली कॅम्प परिसरातील गवळीपाडा येथे राहणारा एक मुलगा शुक्रवारपासून (दि. ८) बेपत्ता आहे. याप्रकरणी त्याच्या आजोबांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अपहरणाची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस यंत्रणा सतर्क

एकाच वेळी शहराच्या वेगवेगळ्या टोकांवरून मुले बेपत्ता झाल्याने नाशिक पोलीस सतर्क झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक मदतीच्या आधारे या मुलांचा शोध घेतला जात आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. संबंधित पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आणि हवालदार या प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.

Comments

No comments yet.