येवल्यातील शेतकरी ॲसिड हल्ला प्रकरणाचा लागला छडा... हा निघाला सूत्रधार... दोन आरोपी जेरबंद...

Share:
Main Image
Last updated: 11-May-2026

येवला, (प्रतिनिधी) ११ मे - येवला तालुक्यातील देवळाणे येथे ८ मे रोजी रात्री एका शेतकऱ्यावर झालेल्या भीषण ॲसिड हल्ला प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि येवला तालुका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, जुना शेतीचा वाद आणि मत्सर यातून हा हल्ला केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

काय आहे घटना?

देवळाणे येथील शेतकरी भाऊसाहेब बोर्डे हे ८ मे रोजी रात्री आपल्या घराच्या गच्चीवर पत्नीसह झोपलेले असताना, अज्ञात आरोपीने त्यांच्या डोळ्यावर आणि शरीरावर ॲसिड टाकून त्यांना गंभीर जखमी केले होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली होती.

'पोलीस मित्र'च निघाला गुन्हेगार

तपासादरम्यान पोलिसांना भाऊसाहेब बोर्डे यांचे गावातीलच चांगदेव मोरे याच्याशी वाद असल्याचे समजले. धक्कादायक म्हणजे, गुन्हा घडल्यापासून चांगदेव हा पोलिसांसोबतच वावरत होता आणि तो स्वतःला 'पोलीस मित्र' म्हणवून घेत होता. मात्र, पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देताना तो वारंवार दिशाभूल करत असल्याचे लक्षात येताच, पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने आपल्या साथीदारासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

Advertisement

अटक केलेले आरोपी:

१) चांगदेव देवराम मोरे (वय ४०, रा. देवळाणे, ता. येवला)

२) सचिन जालिंदर कोटमे (वय २०, रा. देवळाणे, ता. येवला)

हल्ल्याचे कारण:

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी भाऊसाहेब बोर्डे आणि आरोपी चांगदेव मोरे यांच्यात शेतीच्या बांधावरून जुना वाद होता. तसेच, बोर्डे यांचे यावर्षी कांद्याचे पीक चांगले आले होते आणि ते आरोपीबद्दल लोकांसमोर काही बोलल्याचा राग चांगदेवच्या मनात होता. याच रागातून त्याने शेतातील तण जाळण्यासाठी आणलेले ॲसिड बाटलीत भरून रात्रीच्या वेळी झोपलेल्या बोर्डे यांच्यावर फेकले.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे आणि येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या पथकाने केली आहे.

Comments

No comments yet.