नाशिक, (प्रतिनिधी) ११ मे - आदिवासी बांधवांच्या समृद्ध संस्कृतीला आणि कष्टाला 'शबरी नॅचरल्स' या ब्रँडने दिलेली जागतिक ओळख खरोखरच कौतुकास्पद आहे. शबरी महामंडळाच्या योजनांमुळे दुर्गम भागातील आदिवासींचे जीवनमान खऱ्या अर्थाने उंचावत असल्याचे गौरवपूर्ण उद्गार केंद्रीय जनजाती मंत्रालयाच्या संचालक डॉ. वर्नाली डेका (IAS) यांनी काढले. नाशिक जिल्ह्याच्या विशेष क्षेत्रभेटीदरम्यान त्यांनी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कामाची पाहणी केली.
पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्साही स्वागत
डॉ. डेका यांचे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दलपतपूर येथे आगमन होताच स्थानिक आदिवासी बांधवांनी डफली आणि तारपा या पारंपरिक वाद्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. आदिवासी महिलांच्या पारंपरिक नृत्याने भारावून गेलेल्या डॉ. डेका यांनी स्थानिक कलाकारांच्या कलेचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी आदिवासी विकास आयुक्त तथा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, सल्लागार सूर्यांश निगम, महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
काजू प्रक्रिया उद्योगाची पाहणी
क्षेत्रभेटीदरम्यान डॉ. डेका यांनी दलपतपूर येथील 'दावलेश्वर शेतकरी उत्पादक संस्थेच्या' काजू प्रक्रिया उद्योगाला भेट दिली.
आर्थिक सक्षमीकरण: शबरी महामंडळाच्या कर्ज सहाय्यातून उभा राहिलेला हा प्रकल्प आदिवासींच्या आर्थिक उन्नतीचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रवास जाणून घेतला: बागेतून कच्चा काजू तोडण्यापासून ते तो 'शबरी नॅचरल्स'च्या दर्जेदार पॅकेजिंगमध्ये बंद होऊन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा तांत्रिक प्रवास त्यांनी कुतूहलाने समजून घेतला.
प्रत्यक्ष संवाद: प्रकल्पातील लाभार्थी महिला आणि पुरुषांशी संवाद साधताना त्यांच्या उत्पन्नातील वाढ आणि आत्मविश्वास पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
केंद्राकडून विशेष मदतीचे आश्वासन
"शबरी नॅचरल्स आणि शबरी महामंडळ हे महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांसाठी प्रगतीचे भक्कम आधारस्तंभ बनले आहेत," असे मत डॉ. डेका यांनी मांडले. या यशस्वी मॉडेलची दखल घेऊन केंद्रीय जनजाती मंत्रालय आगामी काळात या प्रकल्पांना तांत्रिक व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
क्षेत्रभेटीनंतर त्यांनी नाशिक येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या मुख्य कार्यालयाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.