नाशिकचा सोहम गाजवणार IPL... दिग्गज खेळाडूंसोबत करणार मराठी कॉमेन्ट्री... असा आहे त्याचा थक्क करणारा प्रवास...

Share:
Main Image
Last updated: 10-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० मे - नाशिकच्या क्रीडा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नाशिकचा युवक आणि लोकप्रिय कंटेंट क्रिएटर सोहम शहाणे याची निवड इंडियन प्रीमियर लीग (IPL) साठी मराठी समालोचक म्हणून करण्यात आली आहे. जिओ हॉटस्टारवर सुरू असलेल्या सामन्यांमध्ये सोहम आता भारताचे माजी कसोटीपटू किरण मोरे आणि धवल कुलकर्णी यांच्यासोबत मराठीत थेट धावते वर्णन (कॉमेंट्री) करताना दिसणार आहे.

अवघ्या ११ व्या वर्षी सुरू झाला प्रवास
सोहमचा हा प्रवास अतिशय रोमांचक आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी, सोहम फक्त ११ वर्षांचा असताना त्याला नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या 'एनपीएल' (NPL) स्पर्धेच्या माध्यमातून पहिले व्यासपीठ मिळाले होते. इतर मुले मैदानात क्रिकेट खेळत असताना सोहम टीव्हीसमोर बसून समालोचनाचा सराव करायचा. अकरा-बारा वर्षांच्या वयात मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले आणि सलग काही वर्षे एनपीएलमध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवली.

Advertisement

आरजे ते नऊ लाख फॉलोअर्सचा टप्पा
'आरजे सोहम' म्हणून ओळख प्रस्थापित करणाऱ्या सोहमने रेडिओ आणि सोशल मीडिया क्षेत्रातही आपली छाप पाडली आहे. यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर त्याचे स्वतःचे चॅनल असून त्याचे सुमारे ९ लाख फॉलोअर्स आहेत. गेल्या आठ वर्षांपासून तो युवा पिढीमध्ये एक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखला जातो.

दिग्गजांचे लाभले मार्गदर्शन
सोहमच्या या प्रवासात त्याला प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले आणि माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांसारख्या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आहे. आजवर त्याने स्थानिक स्तरावरील सुमारे ५०० सामन्यांमध्ये समालोचन केले आहे. "रेडिओ आणि सोशल मीडियामध्ये येण्यापूर्वीपासूनच माझ्या आयुष्यात क्रिकेट समालोचन होते, कारण मला याची भयंकर आवड आहे," अशी भावना सोहमने व्यक्त केली.

कृतज्ञता आणि शुभेच्छा
या यशाबद्दल सोहमने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा व सेक्रेटरी समीर रकटे यांचे विशेष आभार मानले आहेत. असोसिएशनने दाखवलेला विश्वास आणि दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी इथवर पोहोचू शकलो, असे तो म्हणतो. दरम्यान, विनोद शहा आणि समीर रकटे यांनी सोहमचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

No comments yet.