बेरोजगारांसाठी मोठी बातमी...  ११,१२७ पदांसाठी भरती...  जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया...

Share:
Main Image
Last updated: 10-May-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १० मे - सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी रेल्वे मंत्रालयाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) देशभरातील १७ रेल्वे झोनमध्ये एकूण ११,१२७ सहाय्यक लोको पायलट (ALP) पदांच्या भरतीसाठी अधिकृत संक्षिप्त अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये 'सेंट्रल रेल्वे'सह महत्त्वाच्या झोनमध्ये मोठ्या संख्येने पदे भरली जाणार आहेत.

महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज भरण्यास सुरुवात: १५ मे २०२६
अंतिम मुदत: १४ जून २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
अधिकृत वेबसाइट: rrbapply.gov.in

झोननुसार रिक्त पदे
रेल्वे मंत्रालयाने १७ झोनसाठी या भरतीला मंजुरी दिली आहे. यामध्ये सर्वाधिक पदे खालील झोनमध्ये आहेत:
१. ईस्ट कोस्ट रेल्वे: १६२५ पदे
२. साऊथ ईस्टर्न रेल्वे: १५३१ पदे
३. सेंट्रल रेल्वे: १४०० पदे

Advertisement

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
पात्रता: १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये (फिटर, इलेक्ट्रीशियन, डिझेल मेकॅनिक इ.) आयटीआय (ITI) प्रमाणपत्र आवश्यक. तसेच अभियांत्रिकीमधील डिप्लोमा किंवा पदवी (BE/B.Tech) असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा: १८ ते ३० वर्षे. (राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयात सवलत मिळेल.)

निवड प्रक्रिया कशी असेल?
लोको पायलट पदासाठी उमेदवारांना चार टप्प्यांमधून जावे लागेल:
१. पहिली संगणक आधारित चाचणी (CBT 1)
२. दुसरी संगणक आधारित चाचणी (CBT 2)
३. संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT)
४. कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी.

देशभरातील अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि सिकंदराबाद यांसारख्या विविध मंडळांमार्फत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी CEN क्रमांक 01/2026 ही सविस्तर अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.