जनगणनेत हे गाव पहिल्या नंबरवर... सर्व कुटुंबांनी केले...

Share:
Main Image
Last updated: 10-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १० मे - जनगणना प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने राज्यासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. राज्यातील पहिले पूर्णपणे 'स्व-गणना' (Self-Enumeration) प्रक्रिया पूर्ण करणारे गाव म्हणून मूठ गावाने बहुमान पटकावला आहे. प्रशासनाचे नियोजन आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यांच्या जोरावर हे यश मिळाल्याची माहिती मुख्य प्रधान जनगणना अधिकारी निरुपमा जे. डांगे यांनी दिली.

३६ घरे, ४३ कुटुंबे अन् १००% सहभाग
मूठ गावामध्ये एकूण ३६ घरे आणि ४३ कुटुंबे असून गावाची लोकसंख्या १४४ आहे. स्वगणना मोहिमेत गावातील प्रत्येक कुटुंबाने उत्साहाने सहभाग नोंदवत आपली माहिती ऑनलाइन पद्धतीने अचूकपणे सादर केली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने हा महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

Advertisement

प्रशासकीय नियोजन ठरले यशस्वी
या यशामागे वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी यांचे सूक्ष्म नियोजन आणि नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व सर्व तलाठी यांनी घेतलेले कष्ट महत्त्वाचे ठरले. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ही प्रक्रिया अत्यंत वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण झाली.

राज्यासाठी प्रेरणादायी कामगिरी
मुख्य प्रधान जनगणना अधिकारी निरुपमा जे. डांगे यांनी मूठ गावाचे अभिनंदन केले असून, राज्यातील इतर गावांनीही या प्रक्रियेचा आदर्श घ्यावा आणि स्वगणना वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयामुळे कोणतेही मोठे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, हे या कामगिरीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

?s=20

Comments

No comments yet.