जगावर अणुयुद्धाचं सावट...  उत्तर कोरियाचा नवा कायदा...  अमेरिकेसह बड्या राष्ट्रांची झोप उडाली...

Share:
Main Image
Last updated: 10-May-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १० मे - जागतिक युद्धाचे ढग गडद होत असतानाच उत्तर कोरियाने एक अत्यंत धक्कादायक आणि आक्रमक पाऊल उचलले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता संघर्ष आणि इराणच्या नेत्यांना लक्ष्य करण्याच्या घटनांनंतर, उत्तर कोरियाने आपले सर्वोच्च नेते किम जोंग ऊन यांच्या सुरक्षेसाठी देशाच्या संविधानात मोठी दुरुस्ती केली आहे. नव्या कायद्यानुसार, जर किम जोंग ऊन यांची हत्त्या करण्याचा प्रयत्न झाला किंवा त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला, तर उत्तर कोरियाचे सैन्य शत्रू राष्ट्रावर थेट 'अणुहल्ला' करणार आहे.

इराण-अमेरिका संघर्षामुळे उत्तर कोरिया सावध
इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य केल्यानंतर उत्तर कोरियाने ही सावध भूमिका घेतली आहे. २२ मार्च रोजी प्योंगयांग येथे झालेल्या १५ व्या 'सुप्रीम पीपल्स असेंब्ली'च्या अधिवेशनात या संविधानात्मक बदलाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. गुरुवारी उत्तर कोरिया सरकारने ही माहिती अधिकृतपणे सार्वजनिक केली. यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली असून आशियाई क्षेत्रात अणुयुद्धाचा धोका निर्माण झाला आहे.

Advertisement

संविधानातील नेमका बदल काय?
आतापर्यंत उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांची सर्व सूत्रे केवळ किम जोंग ऊन यांच्याकडे होती. मात्र, नव्या दुरुस्तीनुसार:
कलम ३ मधील सुधारणा: जर परकीय शत्रूच्या हल्ल्यामुळे देशाच्या अणुसेना कमांड आणि नियंत्रण यंत्रणेला (कमांड स्ट्रक्चर) धोका निर्माण झाला, तर कोणत्याही आदेशाची वाट न पाहता तात्काळ प्रत्युत्तरादाखल अणुहल्ला सुरू केला जाईल.
अक्षमतेच्या स्थितीत निर्णय: जर किम जोंग ऊन काम करण्यास असमर्थ ठरले किंवा त्यांची हत्या झाली, तर सैन्य आपोआप अण्वस्त्रांचा वापर करण्यासाठी अधिकृत असेल.

जगाची झोप उडाली!
किम जोंग ऊन हे त्यांच्या धडाडीच्या आणि आक्रमक निर्णयांसाठी ओळखले जातात. गेल्या काही महिन्यांपासून उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्र प्रणालीचे मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण केले आहे. या नव्या कायद्यामुळे दक्षिण कोरिया आणि अमेरिकेवर थेट दबाव निर्माण झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत किम जोंग यांच्या नेतृत्वाला धक्का लागल्यास त्याचा शेवट महाविनाशक अणुयुद्धात होऊ शकतो, असा इशाराच या बदलातून देण्यात आला आहे.

Comments

No comments yet.