वाळू माफियांचा तलाठ्यावर जीवघेणा हल्ला... अंगावर ट्रॅक्टर घालून फरफटत नेले... ​

Share:
Main Image
Last updated: 09-May-2026

मालेगाव, (प्रतिनिधी) ९ मे - तालुक्यातील सायने बुद्रुक येथे अवैध गौण खनिज चोरी आणि शासकीय जमिनीवर होणारे बेकायदेशीर ब्लास्टिंग रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. कर्तव्य बजावत असताना एका मुजोर ट्रॅक्टर चालकाने तलाठी गोविंद तिडके यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना काही अंतर फरफटत नेले. या धक्कादायक घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

​नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, सायने बुद्रुक येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी तलाठी गोविंद तिडके, मनोज खरोटे आणि किशोर थोरात हे दुचाकीने जात होते. वाटेत त्यांना दगडाने भरलेला एक संशयास्पद ट्रॅक्टर दिसला. शासकीय जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन आणि ब्लास्टिंग सुरू असल्याचा संशय आल्याने हे तिन्ही अधिकारी घटनास्थळावर पोहोचले.

​जीवावर बेतले कर्तव्य
​महसूल पथकाला पाहून तेथील एका व्यक्तीने चालकाला ट्रॅक्टर घेऊन पळून जाण्यास सांगितले. तलाठी गोविंद तिडके यांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने थेट त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

​फरफटत नेले: प्रसंगावधान राखत तिडके यांनी ट्रॅक्टरच्या बाजूचा अँगल पकडला, मात्र चालकाने ट्रॅक्टर न थांबवता त्यांना तशाच अवस्थेत काही अंतरापर्यंत फरफटत नेले.
​बचाव: सुदैवाने तिडके यांनी स्वतःचा बचाव केला, मात्र या घटनेत ते जखमी झाले आहेत.

​गुन्हा दाखल
​या प्रकरणी तलाठी गोविंद तिडके यांनी मालेगाव पोलिसात संबंधित ट्रॅक्टर चालक आणि त्याला चिथावणी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली आहे. शासकीय कामात अडथळा आणणे आणि महसूल अधिकाऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करणे या कलमान्वये पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

​वाळू माफिया आणि गौण खनिज चोरांची हिंमत इतकी वाढली आहे की, ते आता थेट शासकीय अधिकाऱ्यांच्या जीवावर उठले आहेत, यामुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीसह संतापाचे वातावरण आहे.

Comments

No comments yet.