नाशिक, (प्रतिनिधी) ९ मे - शहरातील म्हसरूळ-मखमलाबाद लिंकरोड भागात अपघाताचा बनाव रचून एका कारमधील तीन मित्रांना दुचाकीस्वार टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हिंसक हल्ल्यात एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून, संशयितांनी कारचेही मोठे नुकसान केले आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात १० ते ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रॉन्ग साईडने येऊन दिली धडक
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत उर्फ सोनू संतोष कोराळे (२६, रा. वाढणे कॉलनी) हा तरुण त्याचे मित्र दर्शन गांगुर्डे आणि आदित्य पिंगळे यांच्यासह गुरुवारी (७ मे) सायंकाळच्या सुमारास कारने मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी जात होता. ते म्हसरूळ-मखमलाबाद लिंकरोडवरून प्रवास करत असताना, समोरून चुकीच्या बाजूने (रॉन्ग साईड) आलेल्या एका दुचाकीने त्यांच्या कारला मुद्दाम धडक दिली.
शस्त्रांनी केला हल्ला
अपघात झाल्याचे भासवून दुचाकीवरील टोळक्याने तिन्ही मित्रांना कारबाहेर ओढले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यादरम्यान:
संशयितांनी आदित्य पिंगळे या तरुणाच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले.
एका तरुणाला जीवे मारण्याच्या उद्देशाने संशयिताने कोयता फेकून मारला, जो कारला लागल्याने गाडीचे नुकसान झाले.
संशयितांची नावे आली समोर
या प्रकरणी पोलिसांनी सोनू धात्रक, बाळा निपुंगे, प्रिन्स सहाणी, गणेश पांचाळ (सर्व रा. म्हसरूळ) आणि त्यांच्या ६ ते ७ साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक निरीक्षक बोरसे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, भरवस्तीत झालेल्या या राड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.