नाशिक, (प्रतिनिधी) ९ मे - शहरातील सातपूर औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात एका तरूणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरूणीच्या आईला धक्काबुक्की करत संशयिताने आपल्या मित्रांच्या मदतीने तरूणीचे मोबाईलवर चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेमास नकार दिल्याने संताप
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित रोहन रविंद्र नालकोल (२१, रा. शिवाजीनगर) आणि पीडिता एकमेकांच्या परिचयाचे आहेत. बुधवारी (६ मे) सायंकाळी तरूणी शिवकृपा किराणा दुकानाजवळून जात असताना रोहनने तिची वाट अडवून प्रेमाची मागणी घातली. तरूणीने या मागणीस स्पष्ट नकार दिल्याने संतप्त झालेल्या रोहनने तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि तरूणीचा मोबाईल जमिनीवर आपटून फोडला.
घरात घुसून टोळक्याचा हैदोस
या घटनेनंतर घाबरलेल्या तरूणीने घर गाठले, मात्र संशयिताने रात्री आपल्या मित्रांना सोबत घेऊन पीडितेचे घर गाठले. यावेळी टोळक्याने घरात घुसून तरूणीचा विनयभंग केला. मध्ये पडलेल्या तिच्या आईलाही आरोपींनी धक्काबुक्की केली. या अत्यंत गंभीर घटनेत भामट्यांनी तरूणीला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला आणि मोबाईलवर तिचा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसात गुन्हा दाखल
या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेने गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी रोहन नालकोल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विनयभंग, धमकी आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार पोतन या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार संशयितांचा शोध घेतला जात आहे.