पाच वर्ष अत्याचार आणि १४ तोळ्यांची लूट... नाशिकच्या फेसबुक फ्रेंडचा प्रताप...

Share:
Main Image
Last updated: 08-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ८ मे - नाशिक शहरात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका विवाहितेवर पाच वर्षे बलात्कार करून तिची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याचबरोबर अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग आणि एका दांपत्याला धमकावल्याप्रकरणी पंचवटी, इंदिरानगर व एमआयडीसी पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फेसबुकवरील ओळख पडली महागात; ४ लाखांसह १४ तोळे दागिने लांबवले

पहिली घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तैफिक वसियोद्दीन सैय्यद-पिरजादे (४०) याची २०२० मध्ये फेसबुकद्वारे पीडितेशी ओळख झाली होती. संशयिताने विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून पाथर्डी फाटा आणि खोडेनगर भागात नेऊन वेळोवेळी बलात्कार केला. हा अत्याचार गेल्या पाच वर्षांपासून सुरू होता.  

संशयिताने पीडितेकडून ४ लाख ६३ हजार ६०० रुपयांची रोकड उकळली.  

तसेच माहेरचे आणि सासरचे मिळून सुमारे १४ तोळे सोन्याचे अलंकारही लांबवले.

पीडितेने पैसे व दागिन्यांची मागणी केली असता तिला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.  

नर्सिंग कॉलेजच्या तरुणीचा विनयभंग; 'पोस्को'अंतर्गत गुन्हा

Advertisement

दुसरी घटना पंचवटी आणि दिंडोरी तालुक्यातील मानोरी येथे घडली आहे. संजयनगर येथील विशाल तानाजी आहिरे या तरुणाने एका अल्पवयीन मुलीचा शालेय जीवनापासून पाठलाग करून तिला त्रास देण्यास सुरुवात केली होती.

गुरुवारी (७ मे) त्याने मानोरी येथील नर्सिंग कॉलेजमध्ये पीडितेला गाठले.  

तिला बळजबरीने दुचाकीवर बसण्याचा आग्रह धरला आणि नकार दिला असता जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात 'पोस्को' (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून उपनिरीक्षक सोनवणे अधिक तपास करत आहेत.  

दातीर नगरमध्ये पतीला धक्काबुक्की करत पत्नीचा विनयभंग

तिसरी घटना अंबड औद्योगिक वसाहतीतील दातीर नगर भागात घडली आहे. २९ एप्रिल रोजी राकेश प्रकाश पवार या संशयिताने एका व्यक्तीला धक्काबुक्की करून त्याच्या पत्नीचा विनयभंग केला. संशयित गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने सुरुवातीला दांपत्याने तक्रार दिली नव्हती, मात्र संशयिताने बदनामी सुरू केल्याने अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. उपनिरीक्षक शेवाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.  

शहरातील या वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments

No comments yet.