नाशिक, (प्रतिनिधी) ८ मे - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या नियोजनाला आता खऱ्या अर्थाने गती मिळाली असून, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने अनेक महत्त्वाच्या पायाभूत आणि प्रशासकीय प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवला आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडलेल्या ऑनलाइन बैठकीत स्वयंसेवक प्रशिक्षण, रस्ते विकास, पाणीपुरवठा आणि शहर सौंदर्यीकरण या विषयांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
१५ हजार स्वयंसेवकांची फळी होणार सज्ज
कुंभमेळ्यादरम्यान होणारी अलोट गर्दी लक्षात घेता, आपत्ती व्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रणासाठी १५ हजार स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांकडून 'स्वारस्य देकार' (EOI) मागवण्याच्या प्रक्रियेलाही बैठकीत मंजुरी देण्यात आली. हे प्रशिक्षित स्वयंसेवक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सहाय्य करण्यासाठी तैनात असतील.
पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास
नवा विकास रस्ता: जनार्दन स्वामी मठ ते ड्रीम सिटी चौकापर्यंत ३० मीटर रुंदीच्या विकास रस्त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे कुंभमेळा क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल.
पाणीपुरवठा: साधुग्रामासाठी पाणीपुरवठा यंत्रणा बळकट करण्यासाठी गंगापूर धरण पंपिंग स्टेशन आणि जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये नवीन पंपिंग यंत्रणा बसवण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे.
प्राधिकरण कार्यालय: कुंभमेळा नियोजनाचे मुख्य केंद्र म्हणून जुन्या जिल्हा परिषद इमारतीचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली असून, यासाठी १८ लाख रुपये मासिक भाडे निश्चित करण्यात आले आहे.
डिजिटल कुंभमेळा आणि शहर सौंदर्यीकरण
कुंभमेळ्याची माहिती देश-विदेशातील भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ, तसेच अँड्रॉइड आणि आयओएस मोबाईल अॅप विकसित केले जाणार आहे. तसेच, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरांचे रूप पालटण्यासाठी 'पेंट माय सिटी' अभियान राबवले जाईल, ज्यातून जनसहभागातून शहर सौंदर्यीकरण केले जाणार आहे.
नियोजनबद्ध तयारी आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर विशेष भर देण्यात येत असून, सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचा मानस डॉ. प्रवीण गेडाम यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीस आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.