मालेगाव, (प्रतिनिधी) ८ मे - मालेगाव शहराच्या पुढील २० वर्षांचा सर्वांगीण आणि नियोजित विकास डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिका हद्दवाढ क्षेत्र आणि मूळ हद्द यांचा एकत्रित नवीन विकास योजना नकाशा (DP) तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री तथा स्थानिक आमदार दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली.
सात गावांचा समावेश आणि नवीन गरज
मालेगाव महानगरपालिकेची हद्दवाढ २०११ मध्ये मंजूर झाली होती, ज्यामध्ये सोयगाव, भायगाव, द्याने, दरेगाव, सायने (बु), मालदे आणि संगमेश्वर (कलेक्टर पट्टा) या सात गावांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या दुसऱ्या सुधारित विकास योजनेची मुदत संपत असल्याने, वाढीव क्षेत्रासह नवीन एकत्रित आराखडा तयार करणे आवश्यक झाले आहे.
जमीन वापर नकाशा अंतिम टप्प्यात
महानगरपालिकेच्या नवीन विकास योजनेचे काम 'विशेष घटक' विभागामार्फत सुरू आहे. शहराच्या हद्दीचा नकाशा यापूर्वीच प्रसिद्ध झाला असून, सध्या 'विद्यमान जमीन वापर नकाशा' (Existing Land Use Map) तयार करून त्याची तपासणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा नकाशा लवकरच नागरिकांसाठी प्रसिद्ध केला जाणार आहे.

वाहतूक कोंडी आणि झोपडपट्टी विकासावर भर
आढावा बैठकीत ना. दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या:
वाहतूक नियोजन: शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी डी.पी. रोडचे प्रभावी नियोजन करणे.
नाले मॅपिंग व स्वच्छता: पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांचे शास्त्रोक्त मॅपिंग करणे.
लँड बँक: शहरातील सर्व शासकीय जमिनींची माहिती संकलित करून 'लँड बँक' तयार करणे, जेणेकरून भविष्यातील प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध राहील.
झोपडपट्टी विकास: झोपडपट्टी क्षेत्राचा नियोजित विकास आराखड्यात समाविष्ट करणे.
या नियोजित विकास योजनेमुळे मालेगाव शहराचा चेहरामोहरा बदलणार असून, वाढीव क्षेत्रातील नागरिकांनाही पायाभूत सुविधांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
https://www.facebook.com/share/p/1HgkVQSnak/