साध्या वेशात 'ऑपरेशन नारेगाव'... निदा खानला कशी केली अटक? पोलिस आयुक्तांनी सर्व घटनाक्रमच सांगितला...

Share:
Main Image
Last updated: 08-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ८ मे - नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील प्रमुख संशयित आरोपी निदा खान हिला नाशिक पोलिसांनी अत्यंत नाट्यमयरीत्या ताब्यात घेतले आहे. न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्यानंतर फरार झालेल्या निदा खानला पकडण्यासाठी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्तपणे 'सलग दोन दिवस' विशेष ऑपरेशन राबवून ही कारवाई केली.

नगरसेवकाचा आश्रय पडला महागात

नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या (SIT) तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली होती. फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव येथील स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल याने आश्रय दिल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधून कारवाईचे नियोजन केले.

साध्या वेशात 'ऑपरेशन नारेगाव'

छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी संशयित परिसरात गुप्त पाळत ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केली होती. आरोपीचे अचूक ठिकाण निश्चित होताच, साध्या वेशातील पोलिसांनी विनाचिन्हांकित वाहनांचा वापर केला. नारेगाव परिसरात अत्यंत वेगवान आणि नियोजनबद्ध पद्धतीने धाड टाकून निदा खानला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Advertisement

मदत करणाऱ्यांवरही होणार कारवाई

या गुन्ह्यात केवळ निदा खानच नाही, तर तिला आश्रय देणारा नगरसेवक मतीन पटेल यालाही पोलिसांनी आता आरोपी केले आहे. कायदेशीर प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या आणि गुन्हेगारांना पाठिशी घालणाऱ्या सर्व व्यक्तींची ओळख पटवली जात असून, त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचे संकेत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.

?s=20

आज न्यायालयात हजर करणार

आरोपी निदा खानला आज नाशिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि त्यांच्या पोलीस दलाचे विशेष आभार मानले आहेत.

?s=20

Comments

No comments yet.