नाशिक, (प्रतिनिधी) ८ मे - गंगावाडी परिसरातील मोकळ्या जागेत वाहने पार्क करण्याच्या मोबदल्यात दरमहा चार हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि पैसे न दिल्यास गाड्यांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याच्या मुसक्या आवळण्यात सरकारवाडा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून, अन्य तीन फरार संशयितांचा शोध सुरू आहे. अवधूत सुनील जाधव (२५, रा. दत्तमंदिर, सिडको) आणि आकाश दीपक भुजंगे (२१, रा. गंगावाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी दिगंबर हरिभाऊ सानप (रा. रविवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
नेमका प्रकार काय?
गंगावाडीतील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले उद्यानासमोरील मोकळ्या जागेत परिसरातील नागरिक आपली वाहने उभी करतात. या जागेवर संशयित टोळक्याने बेकायदा दावा ठोकला असून, तेथील वाहनधारकांकडून दरमहा चार हजार रुपयांची मागणी केली जात होती. "पैसे न दिल्यास वाहनासह मालकास जिवंत जाळू", अशी धमकी देत या टोळक्याने परिसरात दहशत निर्माण केली होती.
चार वाहनांचे केले नुकसान
फिर्यादी सानप यांच्यासह काहींनी खंडणी देण्यास ठाम नकार दिल्याने संतप्त झालेल्या टोळक्याने मंगळवारी (दि. ५) सायंकाळी वाहनांवर मोठमोठे दगड टाकून तोडफोड केली. या हल्ल्यात चार गाड्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर सानप यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सरकारवाडा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दोघांना तात्काळ अटक केली असून, पसार झालेल्या सूरज भुजंगे व अन्य दोन साथीदारांचा शोध सहायक निरीक्षक नरेंद्र बैसाणे करत आहेत.