मध्यरात्री बस थांब्यावर एकट्या उभ्या राहिल्या महिला पोलीस आयुक्त... काय आला त्यांना अनुभव? वाचून तुम्हीही थक्क व्हाल...

Share:
Last updated: 08-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ८ मे - केवळ कागदी अहवालांवर विश्वास न ठेवता, शहरातील रस्ते महिलांसाठी रात्रीच्या वेळी किती सुरक्षित आहेत, याची प्रत्यक्ष प्रचिती घेण्यासाठी तेलंगणाच्या मलकाजगिरीच्या पोलीस आयुक्त सुमती यांनी मध्यरात्री एक धाडसी मोहीम राबवली. सामान्य महिलेचा वेश परिधान करून त्या मध्यरात्री १२:३० ते पहाटे ३:३० या वेळेत बस थांब्यावर एकट्याच उभ्या राहिल्या. या अवघ्या तीन तासांच्या काळात तब्बल ४० पुरुषांनी त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

मद्यधुंद तरुणांकडून अश्लील धाडस

पोलीस आयुक्तांच्या या 'स्टिंग ऑपरेशन' दरम्यान, त्यांच्या जवळ आलेल्या ४० पुरुषांपैकी अनेक जण दारूच्या नशेत होते, तर काही जण गांजाच्या अमलाखाली असल्याचा संशय होता. यामध्ये विद्यार्थी आणि नोकरदार तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. आपण एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी संवाद साधत आहोत, याची पुसटशी कल्पनाही या तरुणांना नव्हती.

तत्काळ कारवाई आणि समुपदेशन

Advertisement

या मोहिमेनंतर, सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक मदतीने संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी त्यांना थेट तुरुंगात न धाडता समुपदेशनासाठी बोलावले. सार्वजनिक ठिकाणी महिलांशी वागताना कोणती शिस्त पाळली पाहिजे, याबाबत त्यांना कडक ताकीद देण्यात आली. आयुक्तांच्या या कृतीचे महिला वर्गातून मोठे कौतुक होत आहे.

२५ वर्षांनंतरही तीच धडाडी

आयपीएस सुमती यांनी अशा प्रकारचे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ नाही. २५ वर्षांपूर्वी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काझीपेठ रेल्वे स्थानकावरही त्यांनी अशीच पाहणी केली होती. माओवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुमती यांनी १ मे रोजी मलकाजगिरीच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

या मोहिमेमुळे पोलीस प्रशासनाला शहरातील असुरक्षित ठिकाणांची नेमकी माहिती मिळाली असून, आता त्या भागात रात्रीची गस्त वाढवण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.