नाशिक, (प्रतिनिधी) ७ मे - पाथर्डी फाटा परिसरातील वेलकम हॉटेलजवळ रस्ता ओलांडणाऱ्या एका ५७ वर्षीय महिलेला भरधाव हायड्रोलिक वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गयाबाई काशिनाथ बोडके (५७, रा. संजीवनगर, अंबड लिंकरोड) असे मृत महिलेचे नाव आहे.
नेमका अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, गयाबाई बोडके या मंगळवारी (दि. ५) दुपारच्या सुमारास पाथर्डी फाटा येथील वेलकम हॉटेल परिसरातून रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी पाथर्डी फाट्याकडून येणाऱ्या एका भरधाव हायड्रोलिक वाहनाने (MH 15 FT 3973) त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गयाबाई या गंभीर जखमी झाल्या आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
चालकावर गुन्हा दाखल
याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा मोहन बोडके यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून हायड्रोलिक वाहन चालक दीपक शिंदे याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास हवालदार सावळे करत आहेत. भरधाव वाहनांच्या वाढत्या वेगामुळे पाथर्डी फाटा परिसरात पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नाशिकरोडला दोघांची आत्महत्या...
नाशिक : नाशिकरोड परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून वेगवेगळ््या भागात राहणाºया दोघांनी बुधवारी (दि.६) गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. त्यात २६ वर्षीय तरूणासह ४० वर्षीय महिलेचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ््या मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश संजय मानकर (२६ रा. चांडगाव दत्तमंदिर) या युवकाने बुधवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून जेलरोड येथील उत्सव मंगल कार्यालय येथील राजगडच्या बाजूला पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. हा प्रकार निदर्शनास येताच त्या तात्काळ बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ. अंकिता शिरसाठ यांनी उपचारापूर्वी तपासून मृत घोषीत केले. दुसरा प्रकार जेलरोड भागात घडला. आशा प्रविण घोटेकर(४० रा. अंबिका निवास दसकगाव) या विवाहीतेने बुधवारी सकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी तिला तात्काळ बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ. स्विनल पाटील यांनी तपासून मृत घोषीत केले. हवालदार हिवाळे व जमादार संतोष जाधव तपास करीत आहेत.