नाशिक, (प्रतिनिधी) ७ मे - आगामी २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकचे उद्योग क्षेत्र प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले आहे. 'कुंभ उद्योग संगम' परिषदेत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणासोबत विविध उद्योगांनी ३५ कोटींहून अधिक रुपयांचे सामाजिक दायित्व (CSR) करार केले आहेत. यामुळे कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधांना मोठी गती मिळणार आहे.
कुशावर्त कुंडासाठी २८ कोटींचा प्रकल्प
या उपक्रमातील सर्वात महत्त्वाचा करार व्हीईएल आणि विश्वराज फाउंडेशन यांच्यात झाला आहे. त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त कुंडातील पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी २८ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक यंत्रणा उभारली जाणार आहे. विशेष म्हणजे, पुढील २५ वर्षे या प्रकल्पाची देखभालही हेच फाउंडेशन करणार आहे.
शहर सुशोभीकरण आणि माहिती फलक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया: नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ४ कोटी रुपये खर्चून आधुनिक दिशादर्शक आणि माहिती फलक उभारणार.
अशोका बिल्डकॉन: शहरातील तीन प्रमुख रस्ते दुभाजकांचे सुशोभीकरण करून पुढील १० वर्षे त्यांची निगा राखणार.
सीटीआर संस्था: नाशिक रोडवरील संत ज्ञानेश्वर नगर येथे १ कोटी रुपये खर्चून भव्य 'ई-ग्रंथालय' उभारणार.
सूक्ष्म उद्योजकांना मिळणार व्यासपीठ
केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी 'देआसरा' संस्थेसोबत करार करण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील दोन हजार सूक्ष्म उद्योजकांना प्रशिक्षित करून त्यांना सिंहस्थातील आर्थिक संधींशी जोडले जाणार आहे. कर्ज सुलभता आणि बाजारपेठ उपलब्ध करून देऊन स्थानिकांचा सहभाग वाढवला जाणार आहे.
रामबंधू मसाले, डीजी समूह आणि एसएमबीटी या संस्थांनीही स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि उद्यान सुशोभीकरणासाठी मोठे सहकार्य जाहीर केले आहे.
शाश्वत मालमत्ता निर्माण होणार
"उद्योगांच्या या सहभागामुळे कुंभमेळ्यासाठी केवळ तात्पुरत्या सुविधा न उभारता, कायमस्वरूपी सार्वजनिक मालमत्ता निर्माण होतील. प्रशासकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील हा समन्वय सिंहस्थाचे नियोजन अधिक सुलभ करेल."
- शेखर सिंह (आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण)