आयुष्याची पुंजी एका झटक्यात गायब... निवृत्त शासकीय कर्मचारी महिलेबाबत भयंकर घडलं...

Share:
Main Image
Last updated: 07-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ मे - शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या एका वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करून त्यांना तब्बल ५५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार मेहरधाम (पेठरोड) परिसरात घडला आहे. निवृत्तीनंतर मिळालेली कष्टाची पुंजी हात उसनवार घेऊन ती परत न केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित सुरेश लोहकणे (रा. पंचवटी कारंजा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी मंगला पुरुषोत्तम पाटेकर उर्फ जयश्री चंद्रकांत खिस्ती (रा. मेहरधाम, पेठरोड) यांनी फिर्याद दिली आहे.

काय आहे प्रकरण?

Advertisement

फिर्यादी महिला शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. संशयित रोहित लोहकणे हा महिलेचा परिचित होता. त्याने त्यांचा विश्वास संपादन केला आणि सन २०२० मध्ये विविध कौटुंबिक व वैयक्तिक कारणांचे बहाणे सांगून त्यांच्याकडे मोठी रक्कम हात उसनवार मागितली. महिलेने आपल्या निवृत्तीनंतरच्या बचतीतून उभी केलेली एकूण ५५ लाख रुपयांची रक्कम वेळोवेळी रोख आणि धनादेशाद्वारे रोहितला दिली.

सहा वर्षांपासून पैशांसाठी वणवण

पैसे घेऊन सहा वर्षे उलटली तरी संशयिताने ती रक्कम परत केली नाही. महिलेने वारंवार पैशांचा तगादा लावला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वृद्ध महिलेने म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments

No comments yet.