नाशिक, (प्रतिनिधी) ७ मे - भाच्याच्या लग्नासाठी कपडे खरेदी करण्यासाठी कापड दुकानात गेलेल्या एका महिलेची पर्स सुरक्षा रक्षकाने बाहेर ठेवण्यास सांगितल्याने चोरट्यांनी ती लंपास केली. या पर्समध्ये सोन्याच्या पोतीसह सुमारे २ लाख १५ हजार १०० रुपयांचा ऐवज होता. आडगाव चौफुली परिसरातील जैन पेट्रोल पंपानजीक असलेल्या 'सत्यम टेक्सटाईल्स' येथे मंगळवारी (दि. ५) दुपारी ही घटना घडली.
नेमकी घटना काय?
वंदना विजय शेळके (रा. शिर्डी, ता. राहता) या आपल्या बहिणीच्या मुलाच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी नाशिकमध्ये आल्या होत्या. दुपारी चारच्या सुमारास त्या 'सत्यम टेक्सटाईल्स'मध्ये शिरत असताना सुरक्षा रक्षक कमलाकर देवरे याने त्यांना पर्स आत नेण्यास मनाई केली. शेळके यांनी विश्वासाने आपली पर्स सुरक्षा रक्षकाच्या स्वाधीन केली. सुरक्षा रक्षकाने ती पर्स प्रवेशद्वाराजवळील काउंटरच्या बाजूला जमिनीवर ठेवून दिली होती.
बस्ता बांधला पण दागिने गमावले
कपड्यांची खरेदी आटोपून शेळके नातेवाईकांसह दुकानाबाहेर आल्यावर त्यांना आपली पर्स तिथे दिसली नाही. शोध घेऊनही पर्स न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या पर्समध्ये ४ तोळे वजनाची सोन्याची पोत, मंगळसूत्र, एक हजाराची रोकड आणि काही नवीन कपडे असा ऐवज होता.
याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार पाटील अधिक तपास करत आहेत. कापड दुकानांमध्ये ग्राहकांच्या सामानाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे.