मुंबई, (प्रतिनिधी) ७ मे - भारतातील व्हॅन निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी *'फोर्स मोटर्स'*ने आपल्या सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी अशा 'ट्रॅव्हलर' ब्रँडमध्ये आमूलाग्र बदल करत 'फोर्स ट्रॅव्हलर एन' (N Range) ही नवीन श्रेणी लाँच केली आहे. रुग्णवाहिका, स्कूल बस आणि डिलिव्हरी व्हॅन अशा विविध रूपांत ही श्रेणी उपलब्ध होणार असून, याद्वारे कंपनीने आराम, सुरक्षा आणि कार्यक्षमतेचे नवीन निकष प्रस्थापित केले आहेत.
भविष्याचा वेध घेणारी रचना
फोर्स ट्रॅव्हलरने गेल्या चार दशकांपासून भारतीय बाजारपेठेत ७० टक्क्यांहून अधिक हिस्सा राखला आहे. आता कंपनी पूर्णपणे या नवीन 'एन' रेंजकडे वळणार असून, भविष्यातील सर्व उत्पादने याच श्रेणीनुसार केली जातील. ही नवीन श्रेणी सध्याच्या जुन्या ट्रॅव्हलरची जागा घेणार आहे.
काय आहेत नवीन वैशिष्ट्ये?
नवीन ट्रॅव्हलर एन रेंजमध्ये केवळ इंजिन किंवा कामगिरीतच नव्हे, तर बाह्य आणि अंतर्गत रचनेतही मोठे बदल केले आहेत:
कारसारखा अनुभव: केबिनमध्ये ९-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, डिजिटल क्लस्टर आणि आधुनिक कॉकपीट देण्यात आले आहे.
आकर्षक डिझाइन: डीआरएल (DRL) आणि एलईडी इंडिकेटर्ससह नवीन फ्रंट फॅसिआ आणि रिडिझाइन केलेला मागील भाग यामुळे वाहनाला प्रीमियम लूक मिळाला आहे.
प्रवाशांचा विचार: एर्गोनॉमिकली डिझाइन केलेल्या आरामदायी सीट्स आणि प्रगत कूलिंगसाठी नवीन एचव्हीएसी (HVAC) यंत्रणा.
कमी देखभाल खर्च: फ्लीट ऑपरेटर्सचा देखभाल खर्च कमी होईल आणि वाहने अधिक काळ रस्त्यावर धावू शकतील, अशा पद्धतीने याची रचना केली आहे.
व्यवस्थापकीय संचालकांचे मत
या लाँचप्रसंगी फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया म्हणाले की, "ट्रॅव्हलर एन रेंज तयार करताना आम्ही मालक, चालक आणि प्रवाशांच्या सूचनांचा विचार केला आहे. 'अर्बनिया' या आमच्या प्रगत उत्पादनातून मिळालेल्या अनुभवाचा फायदा आम्हाला ट्रॅव्हलरची गुणवत्ता सुधारण्यासाठी झाला आहे. ही नवीन श्रेणी आजच्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक सक्षम आहे."