राज्यातील सरकारी रुग्णालयांचा होणार कायापालट... या ७ जिल्ह्यांत नर्सिंग महाविद्यालये... या जिल्ह्यांत अत्याधुनिक यंत्रसामग्री...

Share:
Main Image
Last updated: 07-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ७ मे - राज्यातील आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने जपानच्या 'जायका' (JICA) या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत राज्याला ३ हजार ७०८ कोटी रुपयांची वित्तीय सहाय्यता मिळणार असून, मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पायाभूत सुविधांचा होणार विकास

मुख्यमंत्री म्हणाले की, तामिळनाडू आणि आसामप्रमाणेच आता महाराष्ट्रातही 'मेडिकल केअर सिस्टम' मजबूत केली जाणार आहे. या निधीचा वापर प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि नर्सिंग महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, आधुनिक निदान (Diagnostic) यंत्रणा उभारण्यासाठी आणि विशिष्ट आजारांसाठी 'सेंटर ऑफ एक्सलन्स' स्थापन करण्यासाठी केला जाईल.

जिल्हानिहाय मिळणारे लाभ:

नवीन नर्सिंग महाविद्यालये: जळगाव, लातूर, बारामती, मिरज, कोल्हापूर, नंदूरबार आणि गोंदिया या सात जिल्ह्यांमध्ये १०० प्रवेश क्षमतेचे 'बीएस्सी नर्सिंग विद्यालय' स्थापन केले जातील.

Advertisement

श्रेणीवर्धन: मुंबईतील जीटी, सेंट जॉर्जसह धुळे, सोलापूर, अंबेजोगाई, अकोला, नागपूर, रत्नागिरी, पालघर आणि धाराशिव येथील नर्सिंग महाविद्यालयांचा दर्जा सुधारला जाईल.

अत्याधुनिक यंत्रसामग्री: नाशिक, अहमदनगर, भंडारा, गडचिरोली, हिंगोली, जालना, मुंबई, परभणी, सातारा, पालघर, रत्नागिरी आणि वर्धा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना आधुनिक उपकरणांची जोड मिळेल.

भारत-जपान शैक्षणिक आदान-प्रदान

या प्रकल्पांतर्गत केवळ इमारतीच बांधल्या जाणार नाहीत, तर रुग्णालय व्यवस्थापन, प्रशासन आणि मनुष्यबळ विकासासाठी 'भारत-जपान शैक्षणिक आदान-प्रदान' कार्यक्रम राबविला जाईल. यामुळे महाराष्ट्रातील डॉक्टर्स आणि प्रशासकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळण्यास मदत होईल.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा पोहोचवण्याच्या दृष्टीने 'जायका' आणि महाराष्ट्र सरकारमधील ही भागीदारी आरोग्य क्षेत्रातील एक मोठा टप्पा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments

No comments yet.