म्हाडा जमीन घोटाळा... नगररचनेसह भूमी अभिलेखचे बडे अधिकारी गजाआड... बिल्डरांचे धाबे दणाणले...

Share:
Main Image
Last updated: 07-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ मे - नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा जमीन घोटाळा प्रकरणात नाशिक शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून, दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. नगर रचना विभागाचे (Town Planning) सहाय्यक संचालक कल्पेश पाटील आणि भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपीन काजळे अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे महसूल आणि बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

गुन्हे शाखेचा 'दणका'

म्हाडाच्या जमिनींच्या गैरव्यवहार प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून गुन्हे शाखेचे पथक बारकाईने तपास करत आहे. यापूर्वी याच प्रकरणात नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे गुन्हे शाखेने आता कल्पेश पाटील आणि बिपीन काजळे या 'क्लास वन' अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

Advertisement

बिल्डरांचे धाबे दणाणले

सरकारी जमिनी हडपण्यासाठी किंवा त्यांच्या वापरात बदल करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर झालेल्या या मोठ्या साखळीचा पर्दाफाश झाल्याने अनेक बड्या बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. या अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे आता या घोटाळ्याचे धागेदोरे कोणाकोणापर्यंत पोहोचतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून म्हाडाच्या जमिनींच्या प्रक्रियेत नेमकी काय मदत केली, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या अटकेमुळे नाशिकमधील भू-माफिया आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतावर पोलिसांनी मोठा प्रहार केला आहे. उपनिरीक्षक आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments

No comments yet.