मद्यपीचा भररस्त्यात थरार... महिलेची छेड काढून कारची तोडफोड... जेहान सर्कल परिसरातील घटना...

Share:
Main Image
Last updated: 06-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ६ मे - शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या जेहान सर्कल परिसरात एका मद्यपीने महिलेचा विनयभंग करत कारवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित दिगंबर निवृत्ती आंधळे (३३, रा. कलानगर, दिंडोरी रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ५) दुपारी पीडित महिला आपल्या सहकाऱ्यासोबत स्विफ्ट कारमधून प्रवास करत होती. नेर्लेकर चौकातील 'मदिरा वाईन्स'समोर कार आली असता, तिथे उभ्या असलेल्या दिगंबर आंधळे याने महिलेच्या दिशेने बघून अश्लील हावभाव केले. हा संतापजनक प्रकार कार चालवणाऱ्या सहकाऱ्याच्या लक्षात येताच त्याने गाडी थांबवून संशयिताला जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

मात्र, चूक मान्य करण्याऐवजी संशयित दिगंबर याने दोघांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संतापलेल्या संशयिताने रस्त्यावरील दगड उचलून कारच्या दिशेने भिरकावले. या दगडफेकीत कारच्या समोरील काचेचे आणि बोनेटचे मोठे नुकसान झाले आहे. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.

नाशिक : घरासमोर पार्क केलेल्या दुचाकीची डिक्की उघडून चोरट्यांनी पावणे दोन लाख रूपयांची रोकड चोरून नेली. ही घटना पाथरवटलेन भागातील गजानन चौकात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकमल भगवान जोशी (रा. अर्पण विहार,हिरावाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जोशी सोमवारी (दि.४) पैसे काढण्यासाठी बँकेत गेले होते. मोपेड  एमएच १५ केडब्ल्यू २०९४ दुचाकीच्या डिक्कीत पैसे ठेवून ते पाथरवट लेन भागात गेले असता ही घटना घडली. सायंकाळी गजानन चौकातील एका घरासमोर दुचाकी पार्क करून ते अल्पावधीच्या कामानिमित्त काही अंतरावर गेले असता अज्ञात चोरट्यांनी डिक्की उघडून सॅग चोरून नेली. या बॅगेत १ लाख ७४ हजार ४५० रूपयांची रोकड होती. हवालदार नरेंद्र कोरडे तपास करीत आहेत.

Comments

No comments yet.