येवला रुग्णालयात लवकरच मोफत डायलिसीस सुविधा मंत्री छगन भुजबळ यांचे विशेष प्रयत्न...

Share:
Main Image
Last updated: 06-May-2026

येवला, (प्रतिनिधी) ६ मे - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून राज्यशासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मोफत डायलिसीस सेवा लवकरच येवला उपजिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने येवला उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र डायलिसीस कक्ष निर्माण करण्यात येत असून यामध्ये सात डायलिसीस बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या या निर्णयामुळे रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने, भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या मे. एचएलएल लाईफ केअर लिमिटेड यांच्या मार्फत ही डायलिसीस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अंतर्गत मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून येवला उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज स्वतंत्र डायलिसीस कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाच्या पायाभूत सुविधेचे काम अंतिम टप्यात असून लवकरच डायलिसिस कक्षाचा शुभारंभ केला जाणार आहे.

या कक्षामध्ये एकूण ७ डायलिसीस बेडची व्यवस्था करण्यात आली असून, प्रशिक्षित तज्ञ डॉक्टर आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. अत्यावश्यक औषधे व साहित्यांसह संपूर्ण डायलिसीस प्रक्रिया मोफत उपलब्ध होणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.

Advertisement

या उपक्रमामुळे येवला व आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांना नाशिक किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, वेळ व खर्चाची बचत होणार आहे. स्थानिक पातळीवर दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा एक महत्वपूर्ण निणर्य आहे. या निर्णयामुळे नियमित डायलिसीस करणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रतिक्रिया

“येवला तालुका व परिसरातील अनेक रुग्णांना नियमित डायलिसीससाठी मोठ्या शहरांकडे जावे लागत होते. या नव्या सुविधेमुळे त्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे सामान्य नागरिकांना दिलासा देणारा हा निर्णय प्रत्यक्षात येत आहे. भविष्यातही आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल.”

माजी खासदार समीर भुजबळ

Comments

No comments yet.