नाशिक, (प्रतिनिधी) ५ मे – नुकताच प्रदर्शित झालेला “राजा शिवाजी” चित्रपट महाराष्ट्रात मनोरंजन करमुक्त करण्यात यावे असे पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पाठविले आहे.
महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमामुळे मुघलांना सळो कि पळो करून सोडले होते ते त्यांच्या गनिमी काव्याच्या युद्ध कौशल्याने. युद्धात महाराजांना अनेक मावळ्यांनी साथ दिली. या युद्ध कौशल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती जगात सर्वत्र पसरली. मावळ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी आपले प्राण पणाला लावले. युद्धात महाराजांनी शौर्याने अनेक गड-किल्ले कसे मिळविले याचा इतिहास खूप मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकातून शिकवला जातो परंतु तो सविस्तरपणे शिकविला जात नाही. सर्वसामान्यसह विद्यार्थ्याना इतिहास समजण्याचा सोपा मार्ग म्हणजे चित्रपट. चित्रपटाच्या माध्यमातून अनेक इतिहासाचा उलगडा होत असून जनसामान्यापर्यंत इतिहास पोहचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवकालीन इतिहास जगासमोर आणण्यासाठी अनेक चित्रपट येत आहे. त्यातील “राजा शिवाजी” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास या चित्रपटात दाखविण्यात येत आहे.
महाराष्ट्राचा इतिहास सांगणारा ऐतिहासिक चित्रपट “राजा शिवाजी” महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी मनोरंजन करमुक्त करण्यात यावा असे पत्रात नमूद केले आहे. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसने याआधी देखील तानाजी, महात्मा जोतिराव फुले, छपाक यासारखे अनेक चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजन करमुक्त करावे असे निवेदन दिले होते व त्यांच्या मागणीला यश देखील आले होते. इतिहासातील अनेक पाने उलघडण्यासाठी चित्रपट हे माध्यम सोयीस्कर असून सर्वसामान्यांना देखील चित्रपट कमी दरात बघता यावा याकरिता ऐतिहासिक चित्रपट हे करमुक्तच असावे असे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.