नाशकात गुंडगिरी वाढली... कुठे घरमालकिणीचा विनयभंग, तर कुठे मायलेकांवर रॉडने हल्ला...

Share:
Main Image
Last updated: 05-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ मे - शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी हैदोस घातल्याच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत घर मालकिणीचा विनयभंग करून तिला मारहाण करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत मध्यरात्री घरात घुसून मायलेकांवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला.

१. डीजीपीनगर: घरमालकिनीला भाडेकरूंकडून 'रिटर्न गिफ्ट'!

नाशिक-पुणे मार्गावरील डीजीपीनगर भागात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. भाडेकरार संपल्यामुळे घर खाली करण्यास सांगणे एका महिलेला महागात पडले.

नेमकी घटना: वार्षिक करार संपल्याने घरमालकिन शनिवारी रात्री भाडेकरूंकडे विचारणा करण्यास गेली होती.

अत्याचार: यावेळी भाडेकरू खान मझहर सिद्दीकी (२६) याने महिलेचा विनयभंग केला. इतकेच नाही तर त्याची आई परवीन खान आणि बहीण रोजमीन खान यांनी मिळून घरमालकिणीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

२. गांधीनगर: टोकले म्हणून रॉडने फोडले डोके!

दुसरी घटना गांधीनगरमधील राहुलबाग परिसरात घडली. रात्रीच्या वेळी परिसरात विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना टोकणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले.

वाद कशामुळे?: सुधाकर भालेराव (५५) यांच्याकडे त्यांच्या मावस बहिणीला भेटण्यासाठी दोन तरुण मध्यरात्री आले होते. "रात्री-बेरात्री आमच्या घराच्या परिसरात येऊ नका," असे भालेराव यांनी संबंधितांना सुनावले.

घरात घुसून हल्ला: याचा राग धरून दोन अनोळखी तरुणांनी मध्यरात्री दरवाजा तोडून भालेराव यांच्या घरात प्रवेश केला. संशयितांनी भालेराव यांच्यासह त्यांच्या वृद्ध आईवर लोखंडी रॉडने हल्ला केला. या भीषण हल्ल्यात मायलेक गंभीर जखमी झाले आहेत.

तपास आणि पोलीस कारवाई

या दोन्ही गंभीर गुन्ह्यांची नोंद उपनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, हवालदार गोसावी या प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी चक्रं फिरवली आहेत.

Comments

No comments yet.