नाशिक, (प्रतिनिधी) ३ मे - नाशिक शहरातील हजारो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त नागरिकांच्या आरोग्य सेवेचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नाशिकमध्ये तातडीने तीन नवीन 'सीजीएचएस' (Central Government Health Scheme) वेलनेस केंद्रे स्थापन करण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन सविस्तर मागणी केली. या प्रस्तावामुळे नाशिकच्या आरोग्य सुविधेत मोठी भर पडणार असून केंद्राकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकाच केंद्रावर २० हजार लाभार्थ्यांचा भार
सध्या संपूर्ण नाशिक शहरासाठी केवळ एकच 'सीजीएचएस' केंद्र कार्यरत आहे. या एकाच केंद्रावर २० हजारांहून अधिक लाभार्थ्यांचा ताण असून, यामध्ये ७० टक्के लाभार्थी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उपचारांसाठी १२ ते २० किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तासन्तास प्रतीक्षा आणि अपुऱ्या सोयींमुळे लाभार्थ्यांमध्ये मोठी नाराजी आहे.
या तीन ठिकाणी केंद्रांची मागणी
खासदार वाजे यांनी भौगोलिक परिस्थिती आणि केंद्र शासकीय कार्यालयांची उपलब्धता लक्षात घेऊन खालील तीन ठिकाणी नवीन केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे:
१. लेखा नगर / इंदिरानगर
२. देवळाली / नाशिक रोड
३. पंचवटी
या भागात केंद्र शासनाचे कर्मचारी मोठ्या संख्येने वास्तव्यास असून, तिथे पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने ही केंद्रे त्वरित सुरू करणे शक्य असल्याचे खासदार वाजे यांनी नमूद केले.
जागेची अडचण झाली दूर
"मागील वर्षी जागेच्या उपलब्धतेबाबत तांत्रिक अडचण सांगण्यात आली होती. मात्र, आता ती अडचण दूर करण्यात आली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. या मागणीला केंद्र सरकारकडून लवकरच मंजुरी मिळेल, अशी मला खात्री आहे," असा विश्वास खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला.
या नवीन केंद्रांमुळे केवळ गर्दी कमी होणार नाही, तर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घराच्या जवळ गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणे सुलभ होईल. नाशिकच्या आरोग्य व्यवस्थेतील ही एक महत्त्वपूर्ण सुधारणा मानली जात आहे.