नाशिकच्या औद्योगिक भरारीला कुंभमेळ्याची जोड... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘इन्व्हेस्टमेंट समिट’...

Share:
Main Image
Last updated: 03-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ मे - नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रासाठी येणारा आठवडा अत्यंत ऐतिहासिक ठरणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील उद्योग आणि व्यवसायांना जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी ६ मे २०२६ रोजी हॉटेल ताज येथे ‘कुंभ उद्योग संगम’ आणि *‘नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट’*चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.

गुंतवणुकीचे नवे दालन: नाशिक ‘फर्स्ट चॉईस’

उद्योगांच्या दृष्टीने नाशिकमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, समृद्ध दळणवळण यंत्रणा आणि महामार्गांचे जाळे यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. "राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी शासन कटिबद्ध असून, नाशिक आता गुंतवणूकदारांचे 'पहिले पसंतीचे ठिकाण' (Investment Destination) ठरेल," असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला.

कुंभमेळ्यात उद्योगांचे योगदान

कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून, तो जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा उत्सव आहे. हरित नाशिक, स्वच्छ नाशिक यांसारख्या सामाजिक उपक्रमांत उद्योगांचे नेहमीच सहकार्य लाभले आहे. आगामी कुंभमेळ्यातही हे योगदान अधिक प्रभावीपणे मिळावे, हा या 'कुंभ उद्योग संगमा'चा मुख्य उद्देश आहे.

Advertisement

महत्त्वाचे सामंजस्य करार होणार

या समिटमध्ये विविध औद्योगिक संघटना, दिग्गज उद्योजक आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधला जाणार आहे. परिषदेदरम्यान काही नवीन सामंजस्य करार (MoUs) होण्याची शक्यता असून, यामुळे हजारो हातांना रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

दिवसभर परिसंवाद आणि चर्चा

सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत होणाऱ्या या परिषदेत नाशिकच्या औद्योगिक विकासावर विविध परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, उद्योजकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने मार्ग काढण्यासाठी ही परिषद एक प्रभावी व्यासपीठ ठरेल.

?s=20

Comments

No comments yet.