पुणे, (प्रतिनिधी) ३ मे - पुणे शहर पोलीस दलात शनिवारी एकच खळबळ उडाली. आर्थिक गुन्हे शाखेत (EOW) कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) वैशाली तोटेवार यांना २८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. विशेष म्हणजे, थेट पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातच हा सापळा रचून कारवाई करण्यात आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
बदली झाली, कार्यमुक्त झाले तरीही ‘धाडस’ कायम!
वैशाली तोटेवार यांची नुकतीच मुंबई लोहमार्ग पोलीस दलात बदली झाली होती. इतकेच नव्हे तर, त्यांना पुणे शहर पोलीस दलातून अधिकृतपणे कार्यमुक्त (Relieve) देखील करण्यात आले होते. मात्र, पदभार सोडलेला असतानाही आर्थिक गुन्हे शाखेतील एका जुन्या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी त्यांनी ३० लाखांची मागणी केली होती. त्यापैकी २ लाख रुपये यापूर्वीच स्वीकारले होते, तर उर्वरित २८ लाखांची मागणी त्यांनी कायम ठेवली होती.
एसीबीचा सापळा आणि अटक
एका खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून ही लाचेची रक्कम स्वीकारली जात असताना एसीबीने झडप घातली. तोटेवार आणि त्या खाजगी व्यक्तीला २८ लाखांच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे. तोटेवार यांनी ही लाच नेमकी कोणत्या मोठ्या प्रकरणासाठी घेतली होती आणि या व्यवहारात आर्थिक गुन्हे शाखेतील इतर कोणत्या 'बड्या' अधिकाऱ्यांचे हात गुंतले आहेत का? याचा तपास आता एसीबीकडून सुरू झाला आहे.
पोलीस दलात चिंतेचे वातावरण
पोलीस आयुक्तालयासारख्या सुरक्षित आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थिती असलेल्या ठिकाणी इतकी मोठी रक्कम स्वीकारण्याचे धाडस तोटेवार यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, एसीबीच्या या कारवाईने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
सध्या तोटेवार यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांच्या मालमत्तेचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.