नाशिक, (प्रतिनिधी) २ मे - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिकला जागतिक औद्योगिक नकाशावर ठळक स्थान मिळवून देण्यासाठी येत्या ६ मे रोजी 'कुंभ उद्योग संगम व नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे नियोजन काटेकोरपणे आणि समन्वयाने करावे, असे निर्देश उद्योग विकास आयुक्त तथा उद्योग संचालक दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गुंतवणूकदारांसाठी नाशिकमध्ये मोठी संधी
कुंभमेळ्यानिमित्त नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. रस्ते, दळणवळण आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये होणारी ही सुधारणा उद्योजकांसाठी पोषक ठरणार आहे. "नाशिकमधील वातावरण उद्योगस्नेही असून, या परिषदेमुळे भविष्यात उद्योग आणि गुंतवणूकदारांचा ओघ जिल्ह्यात वाढणार आहे," असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला.
प्रशासनाची जय्यत तयारी
या परिषदेला राज्यातील नामवंत मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि दिग्गज उद्योजक उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने आयुक्तांनी खालील महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत:
सुरक्षा व वाहतूक: कार्यक्रमस्थळी कडेकोट सुरक्षा, पार्किंग आणि व्हीआयपी हालचालींसाठी स्वतंत्र नियोजन असावे.
हेल्पडेस्क व नोंदणी: येणाऱ्या गुंतवणूकदारांच्या सुलभ नोंदणीसाठी माहिती केंद्र आणि मार्गदर्शक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.
तांत्रिक सज्जता: सादरीकरणासाठी ध्वनी व दृश्य प्रणाली आणि मीडिया समन्वय सक्षम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
नाशिकसह अहिल्यानगर, नंदूरबार या शेजारील जिल्ह्यांतील उद्योग अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी नमूद केले की, कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणारी विकासकामे ही केवळ धार्मिक सोहळ्यापुरती मर्यादित नसून, ती जिल्ह्याच्या दीर्घकालीन औद्योगिक प्रगतीचा पाया ठरणार आहेत.
या परिषदेद्वारे नाशिकच्या औद्योगिक क्षमतेचे प्रदर्शन केले जाणार असून, नवीन गुंतवणूक आकर्षित करून रोजगार निर्मितीला चालना देणे हे या 'कुंभ उद्योग संगमा'चे मुख्य उद्दिष्ट आहे.