स्क्रीनवर दिसला नफा, पण खिशातून गेले ८४ लाख... नाशकात घडलेला हा प्रकार आहे तरी काय?

Share:
Main Image
Last updated: 02-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २ मे - शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी नाशिकमधील तिघांना तब्बल ८४ लाख २५ हजार ६७३ रुपयांचा गंडा घातला आहे. यामध्ये एका सेवानिवृत्त व्यक्तीसह दोन व्यावसायिकांचा समावेश असून, 'आयपीओ' (IPO) मधून मोठ्या फायद्याचे स्वप्न दाखवून ही लूट करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (IT Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा रचला फसवणुकीचा सापळा

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयितांनी या तिघांशी संपर्क साधला. आपण नामांकित शेअर मार्केट ब्रोकर असल्याचे भासवून भामट्यांनी त्यांना विश्वासात घेतले. 'आयपीओ' खरेदी केल्यास अल्पावधीत मोठी रक्कम मिळेल, असे आमिष दाखवून त्यांना एका बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर खाते उघडण्यास भाग पाडले.

Advertisement

नफा फक्त स्क्रीनवर, प्रत्यक्षात मात्र लूट

संशयितांनी फिर्यादींना विविध यूपीआय (UPI) आयडी आणि बँक खात्यांवर वेळोवेळी पैसे भरण्यास प्रवृत्त केले. या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर त्यांना आभासी पद्धतीने (Virtually) लाखोंचा नफा झाल्याचे दिसत होते. मात्र, जेव्हा या तिघांनी आपली मूळ गुंतवणूक आणि नफ्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना पैसे देण्यास नकार देण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

तपास सुरू

याप्रकरणी सेवानिवृत्त व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. ज्या बँक खात्यांवर ही रक्कम वर्ग झाली आहे, त्या खात्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

Comments

No comments yet.