नाशिक, (प्रतिनिधी) २ मे - नाशिकमधील दोन वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील फरार आरोपी निदा खान हिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे, तर मुंबई नाका पोलीस ठाण्यातील 'शिरखुरमा' गुंगी प्रकरणातील चार आरोपींच्या पोलीस कोठडीत ५ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
१. निदा खानला न्यायालयाचा दणका
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील (गु.र.नं १७८/२०२६) आरोपी निदा एजाज खान हिने अटकेपासून वाचण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सुमारे ४ तास जोरदार युक्तिवाद केला.
या गुन्ह्यात बी.एन.एस. कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची (ॲट्रॉसिटी) कलमेही लावण्यात आली आहेत. आरोपीचा गुन्ह्यातील सक्रिय सहभाग आणि तपासाची प्रगती लक्षात घेता, न्यायालयाने निदा खानचा जामीन अर्ज नामंजूर केला. यामुळे आता तिच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
२. मुंबई नाका अत्याचार प्रकरण : कोठडीत वाढ
दुसरीकडे, मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील (गु.र.नं १६६/२०२६) चार आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. तौसिफ बिलाल अत्तर, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसेन कुरेशी आणि रझा रफिक मेमोन अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी फिर्यादीला शिरखुरमा आणि शीतपेयातून गुंगीकारक पदार्थ देऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे.
तपासाची व्याप्ती वाढली:
ॲड. अजय मिसर यांनी या प्रकरणात तांत्रिक तपासाची गरज असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे:
डिजिटल विश्लेषण: आरोपींच्या लॅपटॉप, कॉम्प्युटरची वेब हिस्ट्री, सोशल मीडिया आणि हाईड स्टोअरेजची तपासणी करणे.
फंडिंगचा संशय: धर्मांतरासाठी काही विशेष फंडिंग झाले आहे का, याचा बँक स्टेटमेंटद्वारे शोध घेणे.
ब्लॅक मॅजिक: आरोपींनी फिर्यादीला ब्लॅक मॅजिक (करणी-बाधा) बाबत माहिती देऊन कशा प्रकारे जाळ्यात ओढले, याचा तपास करणे.
न्यायालयाने तपासातील हे मुद्दे विचारात घेऊन चारही आरोपींना ५ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन्ही प्रकरणांत ॲड. अजय मिसर यांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली.