बाप-लेकाला ६० लाखांचा चुना... बनावट कंपनी चालवायचा... असे झाले उघड...

Share:
Main Image
Last updated: 02-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २ मे - कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एका कुटुंबाला मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याच नावे ६० लाखांचे कर्ज काढून ते परस्पर हडपल्याचा खळबळजनक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. संशयिताने केवळ पैसेच लाटले नाहीत, तर संबंधित कुटुंबाची जमीन बळकावण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिचयातून घातला गंडा

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अवनित प्रीतपाल सिंह गुजराल (रा. टागोरनगर, नाशिक-पुणे रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी रघुनाथ जगन्नाथ गांगुर्डे (रा. पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. गांगुर्डे यांची मुलगी संशयिताच्या 'सुरक्षी श्री मोटर्स' या एजन्सीत कामाला असल्याने दोन्ही परिवारांचा परिचय होता. याच विश्वासाचा फायदा घेत संशयिताने गांगुर्डे यांना शोरूम टाकण्याचा सल्ला दिला आणि पतपुरवठाही केला. मात्र, कोरोना काळात हा व्यवसाय ठप्प झाल्याने गांगुर्डे कुटुंबीय कर्जाच्या खाईत लोटले गेले.

Advertisement

बनावट खाते अन् ६० लाखांची अफरातफर

गांगुर्डे यांची आर्थिक ओढाताण पाहून संशयिताने कर्ज फेडण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याने बँक ऑफ महाराष्ट्रच्या अशोका मार्ग शाखेतून गांगुर्डे बाप-लेकाच्या नावे अनुक्रमे ५० लाख आणि १० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. मात्र, ही रक्कम गांगुर्डे यांना मिळण्याऐवजी, संशयिताने एका बनावट कंपनीच्या नावे बँक खाते उघडून सर्व ६० लाख रुपये परस्पर वर्ग करून घेतले.

जमीन बळकावण्याचा प्रयत्न

फसवणुकीचा हा प्रकार तिथेच थांबला नाही. संशयिताने स्वतःची रक्कम वसूल झाली असतानाही गांगुर्डे यांच्या जमिनीवर आपला हक्क सांगून ती बळकावण्याचा प्रयत्न केला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गांगुर्डे कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली. या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक निसार शेख करीत आहेत.

Comments

No comments yet.