व्यापाऱ्याकडून ५ कोटी उकळले... फिरला इतके देश... भोंदू खरातचे थरारक कारनामे कोर्टात उघड...

Share:
Main Image
Last updated: 02-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २ मे - स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचा आणखी एक काळा कारनामा उघडकीस आला आहे. एका व्यापाऱ्याला 'परिसा'ची शक्ती प्राप्त करून देण्याचे आमिष दाखवून आणि मृत्यूची भीती घालून तब्बल २१ देशांची सफर करणाऱ्या खरातला शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश बी. बडवे यांनी या नवव्या गुन्ह्यात त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मृत्यूची भीती अन् ४-५ कोटींची लूट

या प्रकरणात सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर यांनी न्यायालयात खरातच्या लबाडीचा पाढा वाचला. खरातने फिर्यादी व्यापाऱ्याला "अवतार पूजा" करायची आहे असे सांगून विश्वासात घेतले. त्यानंतर, "जर तू पूजा केली नाहीस, तर नागदेवता तुला दंश करेल आणि त्यात तुझा मृत्यू होईल," अशी भीती घातली. या दहशतीच्या जोरावर त्याने व्यापाऱ्याकडून आतापर्यंत ४ ते ५ कोटी रुपये उकळले आहेत.

व्यापाऱ्याच्या पैशावर परदेश वारी

Advertisement

भोंदू खरातचे ढोंग इतक्यावरच थांबले नाही. "परिसाची शक्ती प्राप्त करण्यासाठी तुला २१ देशांचे भ्रमण करावे लागेल," असे त्याने फिर्यादीला पटवून दिले. प्रत्यक्षात या २१ देशांच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च फिर्यादीने केला आणि खरातने त्यांच्याच पैशावर परदेशात मौजमजा केली.

महागडी कारही केली नावावर

भोंदू खरातने व्यापाऱ्याची एक महागडी कारही हस्तगत केली. सुरुवातीला मृत्यूची भीती दाखवून ही कार स्वतःच्या ताब्यात घेतली आणि नंतर कागदपत्रांमध्ये फेरफार करून ती स्वतःच्या नावावर करून घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

गुन्ह्यांची मालिका मोठी

अशोक खरातवर यापूर्वीच लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. नाशिक पोलिसांनी या भोंदूबाबाच्या विरोधात कडक पावले उचलली असून, त्याच्या मालमत्तेची आणि फसवणुकीच्या व्यापाची व्याप्ती तपासण्याचे काम सुरू आहे. तूर्तास, पोलीस कोठडीत खरातकडून आणखी काही धक्कादायक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

Comments

No comments yet.