नाशिककरांनो... ‘स्व-गणना’ फॉर्म ऑनलाइन भरताय? आधी इकडे लक्ष द्या...

Share:
Main Image
Last updated: 02-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २ मे - भारताची बहुप्रतिक्षित ‘जनगणना २०२७’ आता डिजिटल स्वरूपात आकाराला येत असून, नाशिक जिल्ह्यात आजपासून (१ मे २०२६) ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील नागरिकांना या सुविधेचा लाभ घेऊन स्वतःची आणि कुटुंबाची माहिती डिजिटल पोर्टलवर नोंदवण्याचे आवाहन केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यास प्रगणक घरी आल्यावर नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक:

१ ते १५ मे २०२६: या १५ दिवसांच्या कालावधीत नागरिक स्वतःहून ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

१६ मे ते १४ जून २०२६: या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी जाऊन घरयादी आणि घरगणनेचा टप्पा पूर्ण करतील.

कशी कराल ‘स्व-गणना’?

नागरिकांना घरबसल्या नोंदणी करण्यासाठी प्रशासनाने अत्यंत सोपी पद्धत उपलब्ध करून दिली आहे:

१. पोर्टल: सर्वप्रथम https://se.census.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

२. नोंदणी: कुटुंब प्रमुखाचे नाव आणि मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करा.

Advertisement

३. प्रक्रिया: प्राप्त झालेला OTP टाकून आपली भाषा निवडा आणि घराचा पिन कोड नमूद करा.

४. माहिती: विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा आणि माहिती 'Submit' करा.

'SE ID' जपून ठेवा

माहिती सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर 'H' अक्षराने सुरू होणारा ११ अंकी 'SE ID' (Self-Enumeration ID) प्राप्त होईल. हा आयडी नागरिकांनी जपून ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा प्रगणक (Enumerator) प्रत्यक्ष आपल्या घरी येतील, तेव्हा त्यांना हा आयडी दाखवल्यास माहिती पुन्हा भरण्याची गरज भासणार नाही.

का आहे ही प्रक्रिया महत्त्वाची?

डिजिटल जनगणनेमुळे माहिती संकलनात अचूकता येणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले की, स्व-गणनेमुळे नागरिकांना आपल्या सोयीनुसार आणि निवांतपणे माहिती भरता येईल. ही माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित राहणार असून, देशाच्या भविष्यातील नियोजनासाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

नाशिकमधील सुशिक्षित आणि सजग नागरिकांनी या मोहिमेत हिरीरीने सहभागी होऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

?s=20

Comments

No comments yet.