नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १ मे - ग्रामीण भारतातील महिलांच्या नेतृत्वाखालील बचत गटांना (SHG) बँकिंग प्रक्रियेशी जोडण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी 'इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके'ने (IPPB) विशेष 'बचत खाते' सुरू केल्याचे जाहीर केले आहे. १००% भारत सरकारची मालकी असलेल्या या संस्थेने महिला बचत गटांच्या गरजा लक्षात घेऊन या खात्याची रचना केली आहे.
बँकिंग आता महिलांच्या दारात
या खात्याच्या आरंभाविषयी बोलताना आयपीपीबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विश्वेश्वरन म्हणाले की, प्रत्येक भारतीयासाठी बँकिंग सुलभ करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आयपीपीबीच्या 'डोअर स्टेप बँकिंग' मॉडेलमुळे आणि ग्रामीण डाक सेवकांच्या विस्तृत जाळ्यामुळे आता बचत गटांना औपचारिक आर्थिक व्यवस्थेत सहभागी होणे अधिक सोपे होणार आहे.
बचत गट खात्याची प्रमुख वैशिष्ट्ये:
महिला बचत गटांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी हे खाते अत्यंत किफायतशीर ठेवण्यात आले आहे:
शिल्लक रकमेची अट नाही: खाते सुरू करण्यासाठी किंवा दरमहा विशिष्ट रक्कम (MAB) खात्यात ठेवण्याची कोणतीही सक्ती नाही.
ठेव मर्यादा: या खात्यात कमाल २,००,००० रुपयांपर्यंत रक्कम ठेवता येईल.
व्याज आणि लाभ: बचतीवर त्रैमासिक व्याज दिले जाईल आणि दर महिन्याला व्यवहारांचे मोफत छापील पत्रक (Statement) मिळेल.
विना-शुल्क सुविधा: रोख रक्कम जमा करणे किंवा काढणे, खाते बंद करणे आणि क्यूआर (QR) कार्ड मिळवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
शाश्वत विकासाला मिळणार चालना
डिजिटल प्रणालीद्वारे सुलभ व्यवहार आणि टपाल कार्यालयांच्या मोठ्या जाळ्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना आता बँकेत न जाता आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करता येतील. हे खाते महिला बचत गटांना सक्षम करून शाश्वत उपजीविकेच्या राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.