नाशिक जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये राबविले जाणार हे अभियान... जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते शुभारंभ...

Share:
Main Image
Last updated: 01-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ मे - जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये संपन्न नाशिक - सक्षम नगरपरिषद अभियान राबविण्यात येणार आहे. यात सर्व नगर परिषदांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यात ‘संपन्न नाशिक, सक्षम नगरपरिषद’ या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या कालावधीत जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये १०० दिवसांच्या कालावधीत विविध विकासकामे, स्वच्छता, नागरिक सुविधा आणि पारदर्शक प्रशासन यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत नगरपरिषदांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करणे, तसेच विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हा मुख्य उद्देश आहे.

Advertisement

या मोहिमेत नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी, तसेच संबंधित अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार असून विविध विषयांवर ऑनलाईन बैठका आणि आढावा सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक नगरपरिषदेमध्ये राबविण्यात येणाऱ्या कामांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली जाणार आहे.

‘संपन्न नाशिक, सक्षम नगरपरिषद’ अभियानात प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान (SWM), जल व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, तसेच नागरी सुविधा यांसारख्या विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

या १०० दिवसांच्या कालावधीत करण्यात आलेल्या कामांचे मूल्यमापन केले जाणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नगरपरिषदांना गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक घटकासाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली असून त्यानुसार क्रमवारी जाहीर केली जाईल. या अभियानामुळे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील. प्रशासनातील पारदर्शकता वाढेल आणि नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल. तसेच, नागरिकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती सहायक आयुक्त (नगर परिषद प्रशासन) शाम गोसावी यांनी दिली आहेत.

Comments

No comments yet.