नमो उद्यानातून येवल्याच्या वैभवात पडणार भर... मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते नमो उद्यानाचे भूमिपूजन

Share:
Main Image
Last updated: 01-May-2026

येवला, (प्रतिनिधी) १ मे - शहराचा विकास फक्त रस्ते, इमारती किंवा उद्योग यापुरता मर्यादित नसतो, तर नागरिकांच्या जीवनमानात आनंद, आरोग्य आणि समाधान वाढवणाऱ्या सुविधा देखील निर्माण होणे आवश्यक असते. नमो उद्यान ही त्याच विचाराची फलश्रुती आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या माध्यमातून अत्याधुनिक सोई सुविधा असलेले उद्यान येवला शहरात निर्माण होणार असून नमो उद्यानातून येवल्याच्या वैभवात अधिक भर पडेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहरातील पटेल कॉलनी नमो उद्यानाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे,  नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, भाजपचे ज्येष्ठ नेते कुलकर्णी, शहराध्यक्ष दत्ता निकम, येवला नगरपालिकेचे गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक पारूल गुजराथी, नगरसेवक प्रवीण बनकर, नगरसेवक महेश काबरा, नगरसेवक गोटू मांजरे, नगरसेवक जावेद लखपती, नगरसेविका लक्ष्मीबाई साबळे, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, राजेश भांडगे, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, नितीन गायकवाड, भगवान ठोंबरे, भूषण लाघवे, सुमित थोरात, मलिक मेंबर, सचिन सोनवणे, पार्थ कासार, गणेश गवळी, प्रा.संतोष राऊळ, दिपक पवार यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला शहराच्या विकासाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. “नमो उद्यान” या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख प्रकल्प आहे. हे उद्यान केवळ एक बाग नाही, तर येवल्याच्या प्रगतीचे, सौंदर्याचे आणि आधुनिकतेचे प्रतीक ठरणार आहे. येवला म्हणजे परंपरा आणि संस्कृतीची भूमी. पैठणीसाठी जगप्रसिद्ध असलेले आपले शहर, शिवसृष्टी आणि मुक्तीभूमीसारख्या प्रेरणादायी प्रकल्पांमुळे आधीच ओळख निर्माण करत आहे. आता “नमो उद्यान” या नव्या उपक्रमामुळे येवला शहराच्या विकासात आणखी एक सुवर्णपान जोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, येवला शहरात उभारले जाणारे हे उद्यान येवला शहराला एक नवी ओळख देईल, या उद्यानात प्रत्येक वयोगटासाठी सुविधा निर्माण केल्या जाणार आहे. लहान मुलांसाठी सुरक्षित आणि आकर्षक किड्स प्ले एरिया, ओपन एअर थिएटर, ओपन स्पेस अँड योगा व मिडिटेशन झोन, वयोवृद्ध व इतरांसाठी बैठक व्यवस्था, रीडिंग झोन, ओपन जिम, पाथवे, टॉयलेट ब्लॉक, वृक्षारोपण, सोलर पथदिवे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे. हे उद्यान म्हणजे फक्त विकास नव्हे, तर आपल्या पुढील पिढ्यांसाठी एक सुंदर, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. हे उद्यान येवला शहरातील प्रत्येक नागरिकाला विरंगुळा,आनंद आणि समाधान देणारे हे ठिकाण ठरेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

ते म्हणाले की, येवला शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येऊन नगरपालिकेने याबाबत विशेष काळजी घ्यावी. त्याचबरोबर उद्यान परिसरात देखील वृक्ष लागवड करावी नागरिकांनी आपला लोकसहभाग नोंदवून यामध्ये सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, येवला शहरातील पटेल कॉलनीत भव्य दिव्य स्वरूपात नमो उद्यान साकारण्यात येणार आहे. येथे साकारण्यात येणाऱ्या उद्यानाची काळजी घेण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे. येवला शहरात हे अत्यंत महत्वाचे शिल्प उभे राहणार असून यामध्ये विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्येष्ठा पासून ते बालकांपर्यंत सर्वांना सर्व सोई सुविधा यामध्ये उपलब्ध होणार आहे. या उद्यानातून येवल्यात वैभवात अधिक भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील पाच दिवसीय स्वच्छ्ता मोहिमेचा शुभारंभ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला शहर स्वच्छ व सुंदर करण्यास प्राधान्य देण्यात येत असून माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून येवला शहरात पाच दिवसीय विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत येवला शहरातील नागरिकांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

Comments

No comments yet.