कॉर्पोरेट विश्वातील महत्त्वपूर्ण घडामोड... ईशा अंबानींची मोठी खेळी... प्रियांका चोप्राची ही कंपनीच केली खरेदी...

Share:
Main Image
Last updated: 01-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १ मे - देशातील आघाडीची रिटेल कंपनी रिलायन्स रिटेल लिमिटेडने जागतिक स्तरावर गाजलेल्या प्रियांका चोप्रा जोनास यांच्या ‘एनोमली’ (Anomaly) या हेअरकेअर ब्रँडचे यशस्वी अधिग्रहण केले आहे. या व्यवहारामुळे ब्युटी आणि पर्सनल केअर क्षेत्रात रिलायन्सचे वर्चस्व अधिक मजबूत होणार असून, प्रियांका चोप्राचा हा ब्रँड आता रिलायन्सच्या 'टीरा' (Tira) आणि व्यापक स्टोअर्सच्या जाळ्यामार्फत घराघरात पोहोचणार आहे.

काय आहे 'एनोमली' ब्रँड?

२०२१ मध्ये प्रियांका चोप्राने या ब्रँडची स्थापना केली होती. 'क्लीन', 'व्हेगन' आणि उच्च दर्जाची उत्पादने परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ब्रँडने अल्पावधीत मोठी ओळख निर्माण केली आहे. या करारानुसार, ब्रँडचे ट्रेडमार्क, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सर्व मालमत्ता आता रिलायन्सच्या मालकीच्या असतील.

इशा अंबानींची दूरदृष्टी

Advertisement

या व्यवहाराबाबत बोलताना रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर इशा अंबानी म्हणाल्या, "नव्या पिढीतील ब्युटी ब्रँड्सच्या विस्ताराच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. एनोमलीची जागतिक ओळख आणि दर्जा यामुळे आम्हाला खात्री आहे की, भारतात या ब्रँडचा विस्तार अत्यंत वेगाने होईल."

प्रियांका चोप्राची भूमिका कायम

अधिग्रहण झाले असले तरी प्रियांका चोप्रा या ब्रँडमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून सक्रिय राहतील. "रिलायन्सच्या व्यापक अनुभवामुळे हा ब्रँड अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचेल. विशेषतः इशा अंबानींसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे," अशी भावना प्रियांकाने व्यक्त केली.

भारतासह जागतिक बाजारपेठेवर लक्ष

रिलायन्स आता भारतीय ग्राहकांच्या केसांच्या गरजा ओळखून नवीन उत्पादने विकसित करण्यावर भर देणार आहे. त्याचबरोबर अमेरिका, ब्रिटन आणि मध्यपूर्वेतील बाजारपेठांमध्येही 'एनोमली'चा विस्तार केला जाईल. रिलायन्सच्या 'टीरा' या ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे हा ब्रँड आता अधिक सुलभतेने उपलब्ध होणार आहे.

Comments

No comments yet.