नाशिक, (प्रतिनिधी) ३० एप्रिल - केंद्रीय राखीव पोलीस दलातील (CRPF) अधिकारी असल्याचे भासवून स्वस्त दरात फर्निचर विक्रीचा बहाणा करत सायबर भामट्यांनी नाशिकमधील एका व्यक्तीला ९३ हजार रुपयांना गंडा घातला आहे. फेसबुकवरील जाहिरातीला भुलून तक्रारदाराने पैसे भरले, मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
बदली झाल्याचे सांगून रचले जाळे
भामट्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती, ज्यात त्यांनी आपण सीआरपीएफमध्ये अधिकारी असल्याचे भासवले होते. तक्रारदाराने या पोस्टवर संपर्क साधला असता, त्यांना एस. पी. जाधव आणि संतोष कुमार नावाच्या व्यक्तींनी व्हॉट्सॲपवरून प्रतिसाद दिला. "आमची बदली झाली असून बंगल्यातील नव्याने बनवलेले फर्निचर तातडीने विकायचे आहे," असे सांगून त्यांनी तक्रारदाराचा विश्वास संपादन केला.
टप्प्याटप्प्याने उकळले ९३ हजार
भामट्यांनी फर्निचरचे आकर्षक फोटो पाठवून तक्रारदाराला पसंती देण्यास भाग पाडले. त्यानंतर डिलिव्हरी चार्जेस, गेट पास आणि अन्य तांत्रिक कारणांचे नाव सांगून वेगवेगळ्या बँक खात्यांत तब्बल ९३ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे खात्यावर जमा होताच आरोपींनी आपले सर्व संपर्क क्रमांक बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
सायबर पोलिसांचे आवाहन
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे अधिक तपास करत आहेत. लष्करी किंवा निमलष्करी दलाच्या नावाचा वापर करून ओएलएक्स किंवा फेसबुकवर वस्तू विक्रीच्या जाहिराती येत असतील, तर नागरिकांनी खातरजमा केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नागरिकांनी घ्यायची खबरदारी:
कोणत्याही लष्करी अधिकाऱ्याच्या नावाने येणाऱ्या 'क्रेडेन्शियल्स'वर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
वस्तू प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय आणि ताबा मिळाल्याशिवाय आगाऊ (Advance) पैसे देऊ नका.
संशयास्पद वाटल्यास तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधा.