नाशिक | ३० एप्रिल २०२६
नाशिकच्या जेलरोड परिसरातील हरिकुल नगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कौटुंबिक कलहातून एका पत्नीने चक्क आपल्या मित्राच्या मदतीने स्वतःच्याच घरावर दरोडा टाकला. पती कामावर गेल्याची संधी साधून घरातील ४७ हजारांची रोकड, दागिने आणि चक्क संसारातील जीवनावश्यक वस्तू असा एकूण २ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर दगू माळवे (रा. हरिकुल नगर, जेलरोड) आणि त्यांची पत्नी तेजस्विनी माळवे यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू आहेत. याच वादातून गेल्या शनिवारी (दि. २५) तेजस्विनी हिने धक्कादायक पाऊल उचलले. पती कामावर गेल्याचे पाहून तिने संशयित मित्र तन्वीर दादामिया शेख आणि एका अज्ञात पिकअप चालकाला घरी बोलावले.
कपाटातील रोकड ते घरातील सोफा; काहीच सोडले नाही संशयितांनी घरात बेकायदा प्रवेश करून कपाटातील ४७ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. इतकेच नव्हे, तर भामट्यांनी घरातील कपडे आणि संसारोपयोगी वस्तू देखील सोडल्या नाहीत. हा सर्व सुमारे १ लाख ९९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल एका पिकअपमध्ये भरून संशयितांनी पळ काढला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल सागर माळवे यांनी घरी परतल्यानंतर हा प्रकार पाहिला आणि तातडीने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून पोलिसांनी:
१. तेजस्विनी माळवे (पत्नी) २. तन्वीर दादामिया शेख (मित्र) ३. अज्ञात पिकअप चालक या तिघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पंडित या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कारच्या धडकेत पादचारी ठार...
नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय पादचारी ठार झाले. हा अपघात चेहडी जकातनाका भागात झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दशरथ पांडूरंग पवार (रा. मगर गल्ली, श्रमिकनगर चेहडी) असे अपघातात ठार झालेल्या पादचारीचे नाव आहे. पवार मंगळवारी (दि.२८) जकातनाका भागात गेले होते. रात्री दहा वाजेच्या सुमारास ते आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला.
चेहडी जकात नाका परिसरात पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच ३३ एए १७२५ या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. नातू आकाश पवार यांनी त्यांना बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता दुसºया दिवशी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. हवालदार झाडे तपास करीत आहेत.