विठुरायाच्या गोशाळेचा होणार विस्तार... पंढरपुरात उभा राहणार निसर्गरम्य 'पिकनिक स्पॉट'...

Share:
Main Image
Last updated: 30-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३० एप्रिल - पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेचा आता विस्तार होणार असून, या परिसरात भाविकांसाठी एक आकर्षक 'पिकनिक स्पॉट' देखील विकसित केला जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

विठ्ठलाच्या नैवेद्यासाठी शुद्ध दुधाचा पुरवठा

यमाई तलाव परिसरात मंदिर समितीची गोशाळा कार्यरत आहे. सध्या या ठिकाणी सुमारे २२५ 'गौर' जातीच्या लहान-मोठ्या गायी आहेत. या गायींच्या दुधाचा उपयोग श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या नित्योपचार आणि महानैवेद्यासाठी केला जातो. मात्र, गायींची संख्या आणि चारा साठवणुकीसाठी सध्याची जागा अपुरी पडत असल्याने विस्ताराचा निर्णय घेण्यात आला आहे.

जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू

Advertisement

मंत्रालयात झालेल्या या बैठकीत मंदिर समितीने गोशाळेला लागून असलेल्या ३ हेक्टर १२ आर क्षेत्राची मागणी केली आहे. यापैकी १.२० हेक्टर क्षेत्र आरक्षणातून वगळण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्याच्या सूचना मंत्री बावनकुळे यांनी दिल्या आहेत.

पर्यटनाला मिळणार चालना

केवळ गोशाळाच नव्हे, तर या परिसराचा कायापालट करण्याचा शासनाचा मानस आहे. प्रस्तावित विस्तारात भाविकांसाठी विरंगुळा केंद्र आणि पिकनिक स्पॉट विकसित केला जाईल. यामुळे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना आणि पर्यटकांना नैसर्गिक वातावरणात वेळ घालवण्यासाठी एक नवे ठिकाण उपलब्ध होणार आहे.

"गोशाळेच्या विस्तारासोबतच हा परिसर भाविकांसाठी आकर्षक पिकनिक स्पॉट म्हणून विकसित करावा. यातून गो-पालनाचा संदेश पोहोचण्यासोबतच पंढरपूरच्या पर्यटन वैभवातही भर पडेल."

— चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

Comments

No comments yet.