नाशिक, (प्रतिनिधी) २९ एप्रिल - नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ‘नाशिक जिल्हा बँकिंग रोडमॅप’ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये १० महत्त्वपूर्ण विकास स्तंभांची (Strategic Pillars) निश्चिती करण्यात आली असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेपासून ते शहरी पायाभूत सुविधांपर्यंतच्या प्रकल्पांना बँकिंग क्षेत्राद्वारे बळ दिले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी आराखड्यामुळे जिल्ह्याच्या शाश्वत विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
प्रमुख १० विकास स्तंभ आणि नियोजित उपक्रम:
१. कृषी आणि केसीसी सॅच्युरेशन:
जिल्ह्यात किसान क्रेडिट कार्ड (KCC) चे प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात येणाऱ्या 'सिबिल' (CIBIL) संबंधित तांत्रिक अडचणी दूर करून सुलभ कर्जपुरवठा केला जाईल.
२. ग्रामीण बँकिंग विस्तार (Rural Access):
जिल्ह्यातील अद्याप बँकिंग सेवा पोहोचू न शकलेल्या गावांमध्ये नवीन बँक शाखा उघडण्यावर भर दिला जाईल, जेणेकरून ग्रामीण जनता मुख्य प्रवाहातील अर्थव्यवस्थेशी जोडली जाईल.
३. नील-धवल क्रांती (Blue-White Revolution):
केवळ शेतीवर अवलंबून न राहता दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा मानस आहे.
४. अन्न प्रक्रिया उद्योग (Food Industry):
पीएमएफएमई (PMFME) योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील वाईन उद्योग, दुग्धप्रक्रिया आणि मिलिंग उद्योगांना मोठ्या कर्जाचे पाठबळ दिले जाणार आहे.
५. स्वयं-साहाय्य गट (Social Groups):
महिला सक्षमीकरणासाठी स्वयं-साहाय्य गटांना (SHG) दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यातील कर्ज वेळेत वितरित करून त्यांच्या उपजीविकेची साधने बळकट केली जातील.
६. शहरी कर्ज पुरवठा (Urban Credit):
शहरातील छोट्या व्यावसायिकांसाठी 'पीएम स्वनिधी' योजनेअंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील कर्ज वितरणाला वेग दिला जाईल.
७. रोजगार आणि युवा उद्योजकता:
३२ वर्षांखालील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी PMEGP आणि CMEGP या योजनांतर्गत विशेष सवलती आणि कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
८. शाश्वत ऊर्जा (Sustainability):
'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये सौरऊर्जेचा वापर वाढवून १०० टक्के सॅच्युरेशन साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे.
९. रिअल इस्टेट क्षेत्राला संजीवनी:
घरकुल योजना आणि निधीअभावी रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना वित्तपुरवठा करून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली जाईल.
१०. पायाभूत सुविधा (Infrastructure):
नाशिकच्या रिंग रोडसह इतर मोठ्या प्रकल्पांसाठी सुमारे १४,००० कोटी रुपयांच्या संभाव्य गुंतवणुकीचे नियोजन आहे. याचा थेट फायदा विकसित होणाऱ्या २५ गावांना होणार आहे.
"हा रोडमॅप केवळ कागदावर मर्यादित न राहता, बँकिंग क्षेत्राच्या सक्रिय सहभागातून प्रत्यक्षात उतरवला जाईल. यामुळे ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक लाभ पोहोचून 'समृद्ध नाशिक'चे स्वप्न साकार होईल."
आकडे बोलतात
रिंग रोड: १४ हजार कोटींची संभाव्य गुंतवणूक.
युवाशक्ती: ३२ वर्षांखालील तरुणांवर विशेष लक्ष.
सौरऊर्जा: घराघरांत सौर पॅनेल लावण्याचे लक्ष्य.
कनेक्टिव्हिटी: बँकविरहित गावांत नवीन शाखांचे जाळे.
हा रोडमॅप नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी एक नवा मैलाचा दगड ठरणार आहे.