नाशिक, (प्रतिनिधी) २८ एप्रिल - मुलाने वडिलांना विश्वासात न घेता तारण म्हणून दिलेली कार मित्रानेच परस्पर विल्हेवाट लावून अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार मखमलाबाद परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनकर किसन काकड (५८, रा. सुळेवाडी रोड, काकडमळा, मखमलाबाद शिवार) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. काकड यांच्या मालकीची एक्सयुव्ही कार (क्रमांक एमएच १५ एचवाय ६४४५) त्यांचा मुलगा सुशांत काकड याने सप्टेंबर २०२५ मध्ये आपला मित्र संशयित मुसा आवारे याच्याकडे तारण म्हणून गहाण ठेवली होती. हा व्यवहार करताना मुलाने वडिलांना कोणतीही कल्पना दिली नव्हती.
सहा महिन्यानंतर फुटले भांडं
गेल्या सहा महिन्यांपासून कार घरी नसल्याने दिनकर काकड यांनी याबाबत मुलाकडे आणि संशयित मुसा आवारे याच्याकडे चौकशी केली. मात्र, संशयिताने कार परत करण्यास टाळाटाळ केली. अधिक तपास केला असता, मुसा आवारे याने त्या कारची मालकाच्या संमतीशिवाय परस्पर विल्हेवाट लावून आर्थिक अपहार केल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काकड यांनी पोलीस ठाणे गाठले. या तक्रारीवरून म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपनिरीक्षक क्षीरसागर करीत आहेत.
नाशिक : खरेदीसाठी शोरूममध्ये गेलेल्या व्यक्तीच्या गळ््यातील सोनसाखळी चोरट्यांनी हातोहात लांबविली. ही घटना गंगापूररोड वरील क्रोमा शोरूम येथे घडली. या घटनेत १३ ग्रॅम वजनाच्या व सुमारे एक लाख रूपये किमतीच्या सोनसाखळीवर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश विठ्ठलराव अहिरे (रा.काशिकोनगर गोविंदनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अहिरे गेल्या रविवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास खरेदीसाठी क्रोमा शोरूममध्ये गेले होते. कुटूंबासमवेत रिलायन्स डिजीटल येथे ते खरेदी करीत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे एक लाख रूपये किमतीची सोनसाखळी हातोहात लांबविली. हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.